पुणे: मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गातील कसबा पेठ स्थानकामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा दिला. गरज नसताना कसबा पेठेत भुयारी स्थानक तयार करण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूण २४८ कुटुंबे बाधीत होत असून त्याशिवाय ६ धार्मिक स्थळेही बाधित होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.कसब्यातील या भुयारी स्थानकामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांनी कसबा पेठ रहिवासी नियोजित मेट्रो स्थानक विरोधी संघ स्थापन केला आहे. या संघाचे अमित शिंदे यांनी निवेदन प्रसिद्ध करून आंदोलनाचा तसेच मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. हे नियोजित भुयारी स्थानक बुधवार पेठेत होते. तेथून ते कारण नसताना कसबा पेठेत प्रस्तावित करण्यात आले. भूयारी स्थानकातून वर येण्यासाठी लागणाऱ्या जागेमुळे २४८ घरे बाधीत होत आहेत. ६ धार्मिक स्थळांचे पण स्थलांतर करावे लागणार आहे.याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर लगेचच पालकमंत्री, मेट्रो कंपनी यांना निवेदन देण्यात आले, मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही. तीन वेळा निवेदन दिले, मात्र एकदाही साधी चचार्सुद्धा केलेली नाही.गरज नसताना जुन्या रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या जागेवरून हलवले जात आहे. त्यांचे पुनर्वसन त्यांना हवे तसे करणार असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यासंदर्भात काहीच चर्चा केली जात नाही. कसबा पेठ हा पालकमंत्री गिरीश बापट यांचा विधानसभा मतदारसंघ आहे तरीही ते या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत असे शिंदे यांचे म्हणणे आहे. स्थानक रद्द होत नाही तोपर्यंत रहिवासी आंदोलन करत राहतील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
कसब्यातील रहिवाशांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 1:37 PM
मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गातील कसबा पेठ स्थानकामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
ठळक मुद्देमेट्रो स्थानक बाधित कुटुंबे: पालकमंत्री दुर्लक्ष करत असल्याची टीका