बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने ‘ प्रॉटेस्ट विक ‘
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:18 PM2018-06-30T18:18:36+5:302018-06-30T19:20:29+5:30
रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पुणे : बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन केले. कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी हाताला काळ्या रेबीन लावून आंदोलनात सहभागी झाले होते.
बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी (डीएसके) यांना कर्ज देताना नियमांना बगल दिल्याच्या आरोपावरून झालेली अटक झाल्याच्या कारणावरून मराठे आणि गुप्ता यांच्याकडील अधिकार शुक्रवारी (दि.२९जून) काढून घेण्यात आले. बँकेच्या शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सोपावण्यात आला आहे. दोघेही यापुढे बँकेत कार्यरत राहिले, तरी त्यांना कोणत्याही स्वरूपाचे कार्यकारी अधिकार असणार नाहीत, असे बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे. मराठे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, तातडीची या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी दिल्लीहून केंद्र सरकारचे दोन प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले होते. त्यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत मराठे व गुप्ता यांच्या अधिकारांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संचालक मंडळाने दोघांचेही सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला. डीएसके यांच्या डीएसकेडीएल या कंपनीला कर्ज देताना रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे (आरबीआय) नियम पाळले नाही. तसेच इतर अनेक बेकायदेशीर बाबी करून कर्ज वितरीत केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मराठे व गुप्ता यांच्यासह बँकेचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत व तत्कालिन विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना अटक केली होती. त्याचवेळी डीएसके यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे व डीएसके समूहातील एका कंपनीच्या उपाध्यक्षालाही अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत अस्वस्थ वाटू लागल्याने मराठे यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. अटक आरोपींकडून पोलिसांनी विविध कागदपत्रे जस्त करून याप्रकरणा तपास केला आहे.
मराठे आणि गुप्ता यांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी तातडीने बैठक घेऊन युनायटेड फोरम आॅफ महाबँक युनियनची स्थापना केली. त्यामध्ये ३० जून ते ५ जुलै निषेध सप्ताह पाळण्याचे ठरविण्यात आले आहे. ६ जुलैला होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांची बँक असलेली बँक आॅफ महाराष्ट्रची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.