गौरीसोबत 'बाप्पा' हिमालयात विराजमान; पुण्याच्या कोथरूड परिसरात घरगुती गणपतीची आकर्षक आरास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 06:41 PM2021-09-12T18:41:58+5:302021-09-12T19:16:28+5:30

पुणे शहरातही सोसायटी, घरांमध्ये गणरायाच्या भोवताली केलेली आरास लक्षवेधी ठरत आहे.

'Bappa' in the Himalayas with Gauri; Attractive decoration of domestic Ganapati in Kothrud area of Pune | गौरीसोबत 'बाप्पा' हिमालयात विराजमान; पुण्याच्या कोथरूड परिसरात घरगुती गणपतीची आकर्षक आरास

गौरीसोबत 'बाप्पा' हिमालयात विराजमान; पुण्याच्या कोथरूड परिसरात घरगुती गणपतीची आकर्षक आरास

googlenewsNext
ठळक मुद्देगौरी-गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने, पारंपरिक पद्धतीने होतो साजरा

पुणे : यंदा सर्वत्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी घरोघरी मात्र बाप्पा दिमाखात विराजमान झाले आहेत. अनेकांनी फुलांची आरास, मंदिरं, विविध काल्पनिक, ऐतिहासिक देखावे घरात तयार केले आहेत. पुणे शहरातही सोसायटी, घरांमध्ये गणरायाच्या भोवताली केलेली आरास लक्षवेधी ठरत आहे. 

अशाच एका पुण्यातील कोथरूड भागाच्या गणेश कॉलनीत राहणाऱ्या झांजले कुटुंबीयांनी घरात हिमालय देखावा साकारला आहे. घरातील टाकाऊ गोष्टींपासून हिमालयातील पर्वत रांगा, शिवलिंग आणि त्यामध्ये विराजमान गणपती - गौरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

देवयानी झांजले म्हणाल्या, आम्ही दरवर्षी नवनवीन कल्पना आणत घरातली टाकाऊ वस्तूंपासून देखावे तयार करत असतो. यंदाही शाडू माती बाहेरून आणली आहे. तर घरातील टाकाऊ गोष्टींपासून हा हिमालय, त्यावरील झाडे, शिवलिंग साकारण्यात आली आहे.  

आज लाडक्या गणरायाबरोबरच गौरीचे आगमन झाले आहे. बाप्पाबरोबर नववारी, पैठणी साड्यांमधल्या गौरींचे नयनरम्य दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे. उद्या गौरीपूजन असल्याने फराळाबरोबरच, फळांची मांडणीही गौरी - गणपती समोर केली जाते. तसेच त्याबरोबरच असणारा देखावा कल्पकतेचे उदाहरण ठरत आहे.  

गौरी-गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने, पारंपरिक पद्धतीने साजरा

घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी हिचेही त्यापाठोपाठ आगमन झाले आहे. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्‍या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते.

तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्सवाचे वातावरण असते. तिसर्‍या दिवशी गौरीचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दु:खाची छाया असते. गौरी-गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने, पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गौरी विसर्जन साधारणपणे तिस-या दिवशी वाजत गाजत व गौरीचा जयघोष करीत केले जाते. महाराष्ट्रात गौरी-गणपती या सणाचे आगळे असे सांस्कृतिक महत्व आहे.

Web Title: 'Bappa' in the Himalayas with Gauri; Attractive decoration of domestic Ganapati in Kothrud area of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.