बाप्पानं लवकरचं यांना बुद्धी द्यावी; गणेश मूर्ती विक्री दुकानातूनचं ६० वर्षीय महिलेनं चोरले ५० हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 03:38 PM2021-09-12T15:38:00+5:302021-09-12T15:52:41+5:30
आरोपी महिला आणि तीच्यासोबत आलेल्या दोन महिलांनी गणपती विकत घेण्याचा बहाण्याने स्टॉलवरील दोघांना बोलण्यात गुंतवून ठेवत ५० हजारांची रक्कम चोरली
पुणे : गणपती मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानातून नजर चुकवून ५० हजारांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी एका ६० वर्षाच्या महिलेला अटक करण्यात आली.
रंजना सुरेश साळुंखे (वय ६०, रा. सांगोला, सोलापूर) असं अटक केलेल्या महिलेचं नाव असून तिच्या बरोबर असलेल्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३३ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिलेचा गणेश मूर्ती विक्री व्यवसाय आहे. येरवडा गाडीतळ परिसरात महिलेने मूर्ती विक्रीचा स्टॉल टाकला होता. शुक्रवारी (१० सप्टेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास मूर्ती खरेदीच्या बहाण्याने तीन महिला स्टॉलजवळ आल्या. रंजना साळुंखे आणि तीच्यासोबत आलेल्या दोन महिलांनी गणपती विकत घेण्याचा बहाण्याने स्टॉलवरील दोघांना बोलण्यात गुंतवून ठेवले तसेच दिवसभरात व्यवसायात जमा झालेली स्टॉलवरील ५० हजारांची रोख रक्कम चोरी करून नेली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
अटक केलेल्या महिलेनं न्यायालयात दिली उडवाउडवीची उत्तरं
अटक केलेल्या महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी ही उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. अंगझडतीमध्ये ५ हजारांची रक्कम मिळून आली आहे. गुन्ह्यात चोरलेली रक्कम जप्त करणे तसेच इतर दोन महिलांना अटक करणे, आणखी गुन्हे केले आहेत. त्यांचे इतर साथीदार आहेत का? आदी बाबींचा तपास करण्यासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.