बारामती: बारामतीच्या एका पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेलाच प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिचा संसार अडचणीत आणल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला हातपाय मोडण्याची भाषेचा वापर केल्यानंतर संबंधित पतीने पोलीस अधिक्षकांना संबंधित अधिकाऱ्याविरोधात तक्रार करीत सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात दाखल तक्रार अर्जामध्ये पतीने नमूद केले आहे की, बारामती तालुक्यातील एका गावात हे कुटुंब वास्तव्यास आहे. या महिलेचा विवाह २२ ऑगस्ट २०१० साली झाला आहे. या दांपत्याला दोन मुली आहेत. जुन २०२१ मध्ये संबंधित महिला आणि पतीच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. कौटुंबिक वाद झाल्यानंतर तक्रारीचा तपास ‘त्या’ ‘पीएसआय’कडे सोपविण्यात आला होता. तो निर्माण झालेला वाद कागदोपत्री तडजोडीने संपविण्यात आला.
मात्र, त्यानंतर त्या अधिकाऱ्याने यातील तक्रारदार महिलेचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक मिळविला. ती महिला स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याची माहिती त्या अधिकाऱ्याला मिळाली होती. तिला यासाठी लागेल ती मदत देण्यात आश्वासन देत त्या अधिकाऱ्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. महिलेने पतीकडे ‘एमपीएससी’ करण्याचा हट्ट केला. त्यामुळे पतीने तिला परवानगी दिली. नोव्हेंबर २०२१ मध्ये पतीने त्याच्या पत्नीला त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पुण्यातील नातेवाईकांच्या घरी सोडले. काही दिवसानंतर सदर महिलेने कुटुंबाशी संपर्क तोडायला सुरूवात केली.
हातावर त्या पीएसआयच्या नावाचा कोरलेला टॅटु तिने पतीला दाखविला. पत्नी व फौजदार यांच्यात काहीतरी वेगळेच सुरु असल्याचा संशय आल्यानंतर पतीने पत्नीच्या आई-वडीलांना हा प्रकार सांगणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याला सांगितले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने पतीला फोनवरुन हातपाय तोडायची धमकी देत, त्याच्या पत्नीला सोडून द्यायला सांगितले. ‘मी तिला माझ्या कंपनीत १० टक्के भागीदार करणार आहे, तुला काय करायचे ते कर, अशी त्या अधिकाऱ्याने पतीला धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
याबाबत अतिरीक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी या प्रकरणी तक्रार अर्ज दाखल झाल्याचे सांगत चौकशी सुरु असल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षकांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचे देखील मोहिते म्हणाले.दरम्यान, संबंधित फौजदार तक्रारदार पतीस फोनवरुन हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याची व पत्नीला दहा टक्के भागीदार करणार असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. रक्षकच भक्षक बनल्याची तक्रार झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.