पुणे - बारामतीची जागा 2014 ला महादेव जानकर यांच्याकडे होती. त्यावेळी त्यांच चिन्ह कपबशी होतं. त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर पाच ते दहा हजारांच्या मतांनी ते निवडून आले असते, पवारसाहेबांचा बालेकिल्ला ढासळला असता, असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच, यावेळी कांचनताई कुल बारामतीतून कमळाच्या तिकीटावर लढत आहेत. यंदा इतिहास घडण्याची शक्यता असून परिवर्तन घडून येईल, ती जागा आम्हीच जिंकू, असे म्हणत आठवलेंनी बारामतीत कमळ खुलणार असल्याचे म्हटले.
महायुतीतील नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बारामती आणि राज्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचं वातावरण असल्याचं ते म्हणाले. तसेच बारामती मतदारसंघात यंदा कमळ खुलणार आहे. गतनिवडणुकीत बारामतीची जागा महादेव जानकर यांच्याकडे होती. त्यावेळी त्यांचं चिन्ह कपबशी होतं. त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर पाच ते दहा हजारांच्या मतांनी ते निवडून आले असते. परंतु, यंदा भाजपाकडून कांचन कुल या निवडणूक लढवत आहेत. यंदा परिवर्तन घडणार आहे. आम्ही यंदा बारामती देखील जिंकू. महाराष्ट्रात 40 हून अधिक जागा युतीला मिळतील, असा विश्वासही आठवलेंनी बोलून दाखवला.
दरम्यान, जी वंचित आघाडी आहे, ती वंचित नसून किंचित आघाडी आहे. कारण, महाराष्ट्राच्या राजकारणावर या आघाडीचा किंचित परिणाम होईल, असे म्हणत प्रकाश आंबेडकरानाही टोला लगावला. मी सगळ्या आघाड्या करुन बसलेलो आहे. 2009 मध्ये मी रिपबल्कीन फ्रंटची आघाडी उभारली होती. त्यामध्ये, सीपीएम, सीपीआय, समाजवादी पार्टी, जनता दल, आरपीआयचे सर्व दल अशी मी आघाडी केली होती. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला तिसरी आघाडी मान्य नाही. महाराष्ट्रातील जनतेला एका बाजुला भाजपा-सेना आणि दुसऱ्या बाजुला काँग्रेस-आघाडीच मान्य आहे. त्यामुळे मी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सोडून भाजप शिवसेनेकडे आल्याचेही ते म्हणाले. वंचित आघाडीच्या मत विभाजनाचा फायदा हा भाजपा आणि शिवसेनेलाच होईल. आम्हाला चांगल्याप्रकारे यश मिळेल. देशात मोदींचेच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.