मुंबई : नव्या वर्षाचे स्वागत करण्यास वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागाताच्या उत्साहाला अनुचित घटनेचे ग्रहण लागू नये यासाठी बार आणि परमिट रूम तसेच वाइन शॉपवर करडी नजर राहणार आहे. तळीरामांना रोखण्यासाठी त्यांना एकट्याने वाहन चालवू देऊ नका किंवा सहकारी चालक द्या, असे फर्मान सोडल्यावर त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी हा पहारा ठेवण्यात येणार आहे.नवीन वर्षाचे स्वागत करताना तळीरामांकडून कुठलाही अपघात होऊ नये आणि मुळातच दारू पिऊन कुणीही वाहन चालवू नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष तयारी केली आहे. तळीरामांना रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी तर विशेष नियोजन करताना ७० ठिकाणी नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे शंभर वाहने आणि २०० मोटारसायकलची तयारी ठेवली असून, पेट्रोलिंगवर अधिक भर देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यंदा बार, परमिट रूम, बीअर शॉप यावर करडी नजर ठेवताना त्यांना विशेष सूचनाही केल्या आहेत. तसेच पार्किंगचा गोंधळ होऊ नये, यासाठीही सूचना केल्याचे सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याला शिव वाहतूक सेना नवीन वर्षाच्या जल्लोषात मद्यधुंद वाहन चालकांकडून होणारे अपघात टाळण्याकरिता वाहतूक पोलिसांच्या सहकार्याला शिव वाहतूक सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली.शेख यांनी सांगितले की, यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल १३ हजार ८९५ गुन्हे नोंदवले आहेत. त्यांच्याकडून ३ कोटी २१ लाखांचा दंड वसूल केला आहे. गतवर्षी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर १६ हजार ५२५ गुन्हे दाखल केले असून ३ कोटी ९३ लाखांचा दंड वसूल केला आहे. नवीन वर्षाच्या जल्लोषात या घटनांत वाढ होऊ नये याकरिता शिव वाहतूक सेनेनी ही भूमिका घेतल्याचे शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नववर्षाच्या स्वागता करताना भेसळयुक्त अथवा दुय्यम दर्जाच्या अन्नामुळे आनंदावर विरजण पडू नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाचे २०० अधिकारी सज्ज झाले आहेत. अन्न अधिकाऱ्यांना सज्ज राहायला सांगितले असून कारवाई करण्याचे आदेश प्रशासन आयुक्तांनी दिले आहेत. अन्नाचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण २४ तासांत देण्यात येणार आहे. हॉटेल, धाबे, पार्टीज, सामुदायिक कार्यक्रम इत्यादीवर हे अधिकारी विशेष लक्ष ठेवणार आहेत. येथे आवश्यक प्रकरणात आस्थापनांची सखोल तपासणी करून संशयित नमुने विश्लेषणासह घेऊन तातडीने मुंबई येथील प्रयोगशाळेत दुपारपासून घेण्यात येणार आहेत. या क्रमांकावर तक्रारी नोंदवू शकतात : मुंबई शहर व उपनगर - ज्ञानेश्वर महाले - ९६०४०८५४१, ०२२ - २६५९१२४९, टोल फ्री क्रमांक - १८००२२२३६५