दुष्काळात पाण्यासाठी ‘टँकर’चाच आधार

By admin | Published: April 18, 2016 02:56 AM2016-04-18T02:56:01+5:302016-04-18T02:56:01+5:30

नद्या, नाले, ओढे कोरडे पडले. विहिरी आटल्या... जनावरांना चारा मिळेना... उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे... बारामतीतील ६४ तर इंदापूर तालुक्यातील ३४ गावे, वाड्यावस्त्यांवरील

The basis of 'tanker' for water in drought | दुष्काळात पाण्यासाठी ‘टँकर’चाच आधार

दुष्काळात पाण्यासाठी ‘टँकर’चाच आधार

Next

बारामती : नद्या, नाले, ओढे कोरडे पडले. विहिरी आटल्या... जनावरांना चारा मिळेना... उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे... बारामतीतील ६४ तर इंदापूर तालुक्यातील ३४ गावे, वाड्यावस्त्यांवरील नागरिकांचे हाल पाहवत नाहीत. उघड्या डोळ्यांनी जळून जाणारी पिके पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ‘टँकर’ हाच आधार आहे. त्याच्यादेखील नियमित वेळा नाहीत. शाळेच्या सुट्टीतील मुले शहरांच्या दिशेने रोजगाराच्या शोधात फिरत आहेत.
बारामती, इंदापूर तालुक्यांतील गावे ५० टक्के पैसेवारीपेक्षा कमी असल्यामुळे दुष्काळ जाहीर केल आहे. मात्र या घोषणेनंतर देखील प्रत्यक्षात त्यांच्या पदरी टँकरशिवाय काही पडलेले नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या सूचना आहेत. परंतु संपूर्ण वर्षातील शैक्षणिक शुल्कच माफ करावे अशी मागणी आता होत आहे. या दुष्काळी भागात गेल्यावर चहूबाजूंनी जळून गेलेला ऊस, रखरखीत उन्हाशिवाय काही दिसत नाही.
इंदापूर तालुक्यातील निरवांगी, निमसाखर, रेडा, रेडणी, खोरोची पिठेवाडी, पिठकेश्वर, दगडवाडी, बावडा, घोडकवाडी, बोराटवाडी, सराटी या भागात घरोघरी एक-दोन जनावरे आहेत़ त्यांना सुमारे २ महिन्यांपासून ओला चारा मिळालेला नाही़ दोन महिन्यांपूर्वी ऊस, कडवळ, गिणीगोल हे सर्व दोन महिन्यांपूर्वीच विकत घेतले होते़ या वेळी २४०० रुपये शेकडा वैरण होती. सध्या वैरण संपण्याच्या मार्गावर आहे. आता विकतदेखील वैरण मिळत नसल्याने चारा आणायचा कोठून, जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना त्याचा फटका बसत आहे. बारामती तालुक्यातील बाबुर्डी, काळखैरेवाडी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, पानसरेवाडी, कारखेल, जराडवाडी, खराडेवाडी, कोळोली, उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार, मोराळवाडी, वाकी, कुतवळवाडी, दंडवाडी, साबळेवाडी, निंबोडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजीबावी, भोंडवेवाडी, अंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, सायबाचीवाडी, भिलारवाडी, वाडाणे, तरडोली, मासाळवाडी, लोणी भापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुडाळे, गाडीखेल, मोडवे, मोरगाव, पारवडी या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २२७ वाड्या-वस्त्यांना ३१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील टंचाईच्या गावातील ६६ हजार ८१२ लोकसंख्येला टॅँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब, वडापुरी, गलांडवाडी क्रमांक २, विठ्ठलवाडी, गोखळी, झगडेवाडी, खोरोची, वकीलवस्ती, भोडणी, कौठळी, शेटफळगढे, रुई, कळस, व्याहाळी, दगडवाडी, घोरपडवस्ती, कचरवाडी (निमगाव केतकी), कडबनवाडी, निरगुडे, वायसेवाडी या गावांसह या गावांशी संलग्न असणाऱ्या ४१ वाड्यावस्त्यांना २० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील टंचाईच्या गावांतील एकूण लोकसंख्या ५३ हजार ३६७ इतकी आहे. या भागातील ७ बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी दिली. दुष्काळी गावांना देण्यात येणाऱ्या सवलतींबाबत महसूलसह सर्व खात्यांच्या प्रमुखांना कळविण्यात येते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाते. विद्यार्थ्यांचे परीक्षा
शुल्क माफ करणे, वीजबिल आकारणी न करणे, शेतीपंपाच्या वीजबिलात सवलत आदींबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंमलबजावणी केली जाते.

जनावरांच्या छावण्या तातडीने करा...
बारामती, इंदापूर तालुक्यात दुष्काळात तीव्रता अधिक असून वीजबिले त्वरित माफ करावीत. त्याचसोबत विनाखंडित वीजपुरवठा करावा. त्याचबरोबर जनावरांच्या चारा छावण्या तातडीने सुरू करण्याची मागणी आहे. नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आवर्तनामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु, सतत दुष्काळाग्रस्त गावांचा कायमचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याऐवजी केवळ त्यांच्या भावनांचे ‘राजकारण’ केले जात असल्याचे चित्र आहे. आणेवारीची अट रद्द करून पाणीटंचाई असलेल्या सर्वच गावांना दुष्काळी म्हणून घोषित करण्याची मागणी होत आहे.

दूध उत्पादन घटले...
जनावरांना चारा नाही. पुरेसे पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे दुग्धउत्पादनावर देखील मोठा परिणाम झाला आहे. दिवसभरात दोन वेळेला जवळपास १८ लिटर दूध देणाऱ्या गायी आता ५ ते ६ लिटर दूध देत आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसाय देखील अडचणीत आला आहेत. दुधाच्या अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. चाराच उपलब्ध नसल्याने दिवसातून एकदाच चारा जनावरांना द्यावा लागत आहे, असे निरवांगी येथील शेतकरी अंकुश गणपत पवार यांनी सांगितले.

बारामती, इंदापुरात ५१ टँकर
बारामती तालुक्यात ३१ तर इंदापूर तालुक्यात २० अशा एकूण ५१ टँकरनी दोन्ही तालुक्यातील मिळून एकूण १ लाख २० हजार १७९ लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील २१ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २२७ वाड्या-वस्त्यांना तर इंदापूर तालुक्यातील १७ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ४१ वाड्यावस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: The basis of 'tanker' for water in drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.