सावधान ! रस्त्यावर वाहन पार्क केल्यास होऊ शकते अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 03:06 PM2018-12-06T15:06:40+5:302018-12-06T15:16:05+5:30
मार्केटयार्ड पोलिसांनी नुकतीच अशा ६ वाहनचालकांना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते़.
पुणे : शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी व वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहर पोलिसांनी आता त्यांच्याकडे आलेल्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी सुरु केली आहे. तुम्ही जर सार्वजनिक रस्त्यावर वाहने पार्क करुन वाहतुकीस अडथळा आणल्यास तुमच्या अटकेची कारवाई होऊ शकते़. मार्केटयार्ड पोलिसांनी नुकतीच अशा ६ वाहनचालकांना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते़.
गुलटेकडी मार्केटयार्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने येतात़. वाहन चालक काही एक विचार न करता बेजाबदारपणे त्यांच्या सोयीनुसार त्यांची व्यावसायिक वाहने रस्त्यावरच उभी करुन जात असल्यामुळे सार्वजनिक वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत़. त्यामुळे मार्केटयार्ड पोलिसांनी दोन दिवस विशेष मोहिम राबवून त्यात ३ ट्रक, २ टेम्पो आणि एका मोटारीवर कारवाई करुन त्यांच्या चालकांना अटक केली़. दोषारोप पत्रासह त्यांना न्यायालयात पाठविण्यात आले़ त्यावर न्यायालयाने सुनावणी घेऊन त्यांना दंड करण्यात आला़.
याबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्याधन पवार यांनी सांगितले की, मार्केटयार्डत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने येतात़. त्यांनी कोठेही वाहने पार्क केल्याने अनेकदा संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होतो़. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनचालकांना अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करुन न्यायालयात पाठविण्यास सुरुवात केली आहे़. ही मोहिम यापुढेही चालू राहणार आहे़.