पुणे: डेक्कन जिमखाना येथील गुडलक हॉटेल शेजारच्या गल्लीत नागरिकांकडून बेशिस्तपणे वाहने पार्क करण्यात येत होती. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मागील काही वर्षांपासून नागरिकांकडून या बेशिस्तपार्किंग विरोधात आवाज उठवला जात होता. अखेर पुणे वाहतूक शाखेकडून हॉटेल गुडलक ते सुवर्णस्मृती मंगल कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील दुतर्फा वाहने पार्क करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुडलक हॉटेलच्या शेजारच्या गल्लीत वाहने पार्क करण्यास परवानगी देण्यात आली होती.मात्र दिवसेंदिवस याठिकाणी वाहनांची संख्या वाढतच चालली होती. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसाठी ही बाब फारच डोकेदुखी ठरत होती. याबाबत डेक्कन जिमखाना परिसरातील नागरीक येथील वाहनांची पार्किंग हटवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होते. मात्र आता वाहतूक शाखेकडून डेक्कन जिमखाना परिसरातील गुडलक शेजारच्या गल्लीत हॉटेलमध्ये वाहने पार्क करण्याला परवानगी नाकारली आहे.याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहे.
पुणे महापालिकेला सुद्धा या रस्त्यावरच्या पार्किंगला मनाई असल्याचे फलक लावण्यासंबंधी पत्र पाठवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत परिसरात नो पार्किंगचे फलक देखील लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.