चाकण : मेदनकरवाडी (ता. खेड) येथून राहत्या घरातून एकाचे अपहरण करून त्याला मारहाण करून २३ हजाराच्या रकमेसह दीड लाखाची मोटार घेऊन अपहरणकर्त्यांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नानासाहेब खराडे (वय ४२, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण, मुळगाव कारखेल, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी इसमांसह पांडुरंग औटी (रा. येलवाडी, ता. खेड) असा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास खराडे हे घरात झोपलेले असताना चौघांनी दार वाजवून त्यांना उठविले व खराडे यांना मोटारीतून एमआयडीसी भागात पळवून नेवून बेदम मारहाण केली. अपहरणकर्त्यांनी पैशांची मागणी केली असता त्यास नकार दिला असता एकाने डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर खराडे यांनी पैसे देण्याचे कबूल केल्याने विविध भागातील एटीएममधून त्यांच्या खात्यातून वीस हजाराची रक्कम काढून घेतली. त्यानंतर शनिवारी स्टेट बँकेच्या चाकण येथील शाखेतून विड्रॉल स्लिप भरून ५० हजाराची रक्कम काढण्यासाठी खराडे यांना पाठवून दोन अपहरणकर्ते कोहिनूर सेंटरच्या शाखेच्या बाहेर थांबले व दोघेजण मोटारीत बसून राहिले. बँकेत प्रवेश करताच अपहृत खराडे हे थेट अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन संरक्षित झाले. ते जखमी झाल्याने त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्यामुळे सगळे कर्मचारी गोंधळून गेले. परंतु आपले पैशासाठी अपहरण झाल्याचे सांगितल्यानंतर बँकेतील वातावरण शांत झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चाकण पोलिसांना कळविले त्यामुळे अपहरणकर्ते मोटारीतून पळून गेले. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
घरातून अपहरण करून लाटले पावणेदोन लाख, चौघांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:06 PM
मेदनकरवाडी (ता. खेड) येथून राहत्या घरातून एकाचे अपहरण करून त्याला मारहाण करून २३ हजाराच्या रकमेसह दीड लाखाची मोटार घेऊन अपहरणकर्त्यांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देमारहाण करून २३ हजाराच्या रकमेसह दीड लाखाची मोटार घेऊन अपहरणकर्त्यांनी केला पोबारातीन अनोळखी इसमांसह पांडुरंग औटी असा चौघांवर गुन्हा दाखल