पुणे : एकेकाळी भारतीय संस्कृतीमध्ये कलेला गतवैभव होते मात्र आज ते हरपले आहे. याला सामान्य व्यक्ती नव्हे तर राजकीय व्यक्ती कारणीभूत आहेत.साहित्य, चित्र किंवा चित्रपट असो त्याचा निषेध नोंदविला जातो. कादंब-या, चित्रे जाळली जातात. ही कृत्य करणा-यांना कला किंवा साहित्य म्हणजे काय? हे तरी कळते का? असा सवाल उपस्थित करीत अशा गोष्टींचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याची टीका प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी केली.
आर्ट पुणे स्क्रीन च्या वतीने रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर जे.जे स्कूल आॅफ आर्टसमध्ये शिक्षण घेण्यापासून ते ‘न्यूड’ चित्रपटाचा प्रवास जाधव यांनी कथन केला. याप्रसंगी चित्रकार आदित्य शिर्के उपस्थित होते.
जाधव म्हणाले, जे.जे स्कूल आॅफ आर्टस ने एक फौंडेशन तयार केले होते. कोणत्याही विषयांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन दिल्याने आपोआपाच मनामध्ये चित्रपट तयार होत गेला. कोणता विषय निवडायचा आणि प्रेक्षकांना काय पाहायला आवडेल ही दृष्टी जे.जे कडून मिळाली. दिग्दर्शक हा लोकांसाठी नाही स्वत:साठी चित्रपट निर्माण करतो. त्याला त्यामधून काय शिकायला आवडेल हे तो बघतो. ‘नटरंग’, ‘बालकपालक’ मधून खूपकाही शिकायला मिळाले. ‘न्यूड’ हा विषय कधीपासून डोक्यात होता. पण हा शब्दच इतका अवघड होता. पहिला चित्रपट हा केला असता तर कुणी पाहिला नसता, पण एक वेळ आली की आता करायला काही हरकत नाही असे वाटले. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यास म्हणून ‘न्यूड’ चित्र काढावी लागतात आणि त्यांच्यासमोर प्रत्यक्षात खरोखरच न्यूड मॉडेल बसतात. न्यूड मॉडेल म्हणून काम करणा-या महिलांसाठी तो त्यांच्या कामाचा एक भाग असतो. जे जे चा विद्यार्थी असल्याने तेव्हापासूनच माझ्या मनात या न्यूड मॉडेल आणि त्यांच्या कामाविषयी एक कुतूहल निर्माण झाले असल्याचे जाधव यांनी सांगितले. तीन वर्षांनंतर हा चित्रपट पूर्ण झाला पण इफ्फी मध्ये नावामुळे चित्रपट रिजेक्ट झाल्याचा धक्का बसला. खरेतर हा केवळ नजरेचा खेळ असतो, न्यूड पेंटिंग करताना नजर मेलेली असते. या चित्रपटात खरच काही आक्षेपार्ह आहे का? असा उलटप्रश्न त्यांनी प्रेक्षकांना केला.
आदित्य शिर्के यांनी मुंबईमध्ये केवळ तीनच मॉडेल्स असायच्या. त्या मिळणेही खूप अवघड होते. त्याच पुण्यात बोलवाव्या लागायच्या. मात्र अशा पेंटिंगना गँलरी मिळत नव्हती असे सांगून अनुभव शेअर केला. पुण्यात चित्रप्रदर्शन भरविले होते त्यामध्ये काही न्यूड चित्र होती. त्यावेळी एक फोन आला .काय करायचे सुचेना? म्हणून आम्ही ती चित्र पालथी घालून ठेवली. न्यूड विषयाबबात आजही खूपच गैरसमज असल्याचे ते म्हणाले.