पुणे : शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या मालकीचे, केजी टू पीजी मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत उत्साहाच्या वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या लाँग मार्च काढण्यात आला. या लाँग मार्च पाठीमागचा उद्देश हा सरकारच्या शिक्षण व रोजगार यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराचा हक्क मिळावा हा आहे. गुरुवारी (दि. १५ नोव्हें) दुपारी ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यापासून या लाँग मार्चला सुरुवात झाली असून तो मुंबईतीलमंत्रालयावर धडकणार आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने या लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. मोर्च्यामध्ये विद्यार्थिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. शासनाचे शाळा बंद करण्याचे धोरण, आक्षेपार्ह व चुकीचा अभ्यासक्रम निर्मिती,आदिवासी - मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद करणे , शिक्षक भरतीसह संपूर्ण नोकरभरती बंद करणे याविरोधात हा लॉंग मार्च मुंबईमंत्रालय येथे धडकणार आहे. या लाँग मार्चमध्ये ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव , सुरेश खैरनार , पन्नालाल सुराणा , आमदार कपिल पाटील , आमदार सुधीर तांबे , जे यु नाना ठाकरे , सुभाष वारे , नगरसेविका अश्विनी कदम , अल्लाऊद्दीन शेख , विनय सावंत, संदेश भंडारे, जाकीर अत्तर , प्रमोद दिवेकर हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सरकारच्या शिक्षण व रोजगार विषयावरील अपयश अधोरेखित केले. विद्यार्थी युवकांनी या सरकारचे अपयश मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेला समजावून सांगण्याचे आवाहन केले. या लॉन्ग मार्चला पाठिंबा म्हणून आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी व पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. या मोर्च्याचो संपूर्ण नियोजन दत्ता ढगे (७४४७८४४१३१), लोकेश लाटे(८३५६०८४४५१) , रशीद मणियार, शिवराज सूर्यवंशी, प्रशांत दांडेकर, संदीप आखाडे, राकेश पवार, सागर भालेराव, कीर्ती इटकर , अनिकेत घुले यांनी केले असून पुणे ते मुंबई पर्यंत या तरुणांच्या नेतृत्वाखाली हा मोर्च्या मंत्रालयावर धडकणार आहे.
शिक्षण-रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 5:21 PM
सरकारच्या शिक्षण व रोजगार यांच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठविणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराचा हक्क मिळावा हा आहे.
ठळक मुद्देऐतिहासिक महात्मा फुले वाड्यापासून या लाँग मार्चला सुरुवात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिला पाठिंबातरुणांच्या नेतृत्वाखाली हा मोर्च्या मंत्रालयावर धडकणार