दर्जेदार शिक्षणासाठी ‘सिंबायोसिस’ची मुहूर्तमेढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:03+5:302021-02-10T04:13:03+5:30

———————————— ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी २६ जानेवारी १९७१ रोजी सिंबायोसिस या संस्थेची स्थापना केली. ...

The beginning of ‘Symbiosis’ for quality education | दर्जेदार शिक्षणासाठी ‘सिंबायोसिस’ची मुहूर्तमेढ

दर्जेदार शिक्षणासाठी ‘सिंबायोसिस’ची मुहूर्तमेढ

Next

————————————

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी २६ जानेवारी १९७१ रोजी सिंबायोसिस या संस्थेची स्थापना केली. परदेशी विद्यार्थ्यांसाठी काही तरी केलं पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात पक्का होऊ लागला आणि सिंबायोसिस संस्थेची निर्मिती झाली.

सिंबायोसिसची लवळे आणि किवळे या ग्रामीण भागात २ विद्यापीठे असून, इंदोरमध्ये तिसरे विद्यापीठ आहे. ७० विविध संस्थांमध्ये भारतातील सर्व राज्यांमधून व ८५ देशांमधील ४०,००० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. सिंबायोसिस दूरशिक्षण केंद्राचा भारतातील व परदेशातील २ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी लाभ घेतात. आनंदी गोपाळ यांची प्रेरणा आणि सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती मार्च २०१९ मध्ये डॉ. मुजुमदारांच्या आयुष्यात एक योगायोग अचानक जुळून आला. ‘आनंदी गोपाळ’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. तो सिनेमा त्यांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या ‘आनंदीचा’ वयाने तिच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळशी विवाह होतो. लग्नानंतर काही वर्षांनी आनंदी मुलाला जन्म देते. तिचे मूल आजारी पडते. एके दिवशी ते बाळ सतत रडू लागते, म्हणून वैद्याला बोलविण्यात येते. वैद्य येतो. त्यावेळी बाळ शांत झालेले असतं. वैद्य बाळाला तपासतो आणि बाळ देवाघरी गेल्याचं आनंदीला सांगतो. आनंदी उन्मळून जाते, रडते, आक्रोश करते आणि शेवटी आपण डॉक्टर असतो, तर कदाचित बाळ वाचले असते, ही तिची भावना होते. त्यानंतर कितीही अडचणी आल्या तरी डॉक्टर होण्याची तिची जिद्द, त्यासाठी गोपाळने तिला केलेली अपरंपार मदत, आनंदीने अमेरिकेतल्या विद्यापीठात जाऊन मिळविलेली डॉक्टर पदवी, भारतात येऊन डॉक्टरचा व्यवसाय करण्याची तिची इच्छा आणि काही वर्षानंतर क्षयरोगाने तिचे झालेले निधन, या सिनेमातील सर्व घटना पाहून डॉ.मुजुमदार चकित झाले. देशाच्या इतिहासातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदी कायमची त्यांच्या लक्षात राहिली आणि सिंबायोसिसने केवळ मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, ही कल्पना त्यांच्या मनात जागरूक झाली. त्यानंतर केवळ ११ महिन्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परवानगी मिळाली आणि १ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्रातील पहिल्या व भारतातील तिसऱ्या ‘महिला वैद्यकीय महाविद्यालयाचे’ उद्घाटन झाले. या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या आणि गुणवत्तेवर आधारित असलेल्या पहिल्या ५ मुलींना ‘आनंदी गोपाळ’ शिष्यवृत्ती प्रदान केली असून त्यांचे सर्व शिक्षण मोफत होणार आहे. सिंबायोसिसने स्थापन केलेल्या ९०० बेडच्या रुग्णालयात १ जानेवारी २०२१ पासून येथे उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय डॉ. मुजुमदारांनी सिंबायोसिसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त घेतला आहे.

भारत सरकारने डॉ. मुजुमदार यांना २००५ मध्ये ‘पद्मश्री’ व २०१२ मध्ये ‘पद्मा भूषण’ सन्मान प्रदान केला. टिळक महाराष्ट्र विद्यपीठाने २०१६ मध्ये डी.लिट्. पदवी प्रदान करून सन्मानित केले. सन २०१६ मध्ये ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृती पुरस्काराने’ त्यांना गौरवण्यात आले आहे. पुण्यभूषण या व अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांच्या कारकिर्दीला झळाळी प्राप्त झाली आहे. या सर्व कार्यात डॉ.मुजुमदारांच्या मोठ्या कन्या डॉ.विद्या येरवडेकर आणि धाकट्या कन्या डॉ.स्वाती मुजुमदार मोठ्या ताकदीने त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असून संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.

- उपेंद्र खाडिलकर

Web Title: The beginning of ‘Symbiosis’ for quality education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.