बैलगाडा शर्यतीविना यात्रा ओस; ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 02:13 AM2019-03-10T02:13:16+5:302019-03-10T02:13:30+5:30
- शिवाजी आतकरी खेड : बैलगाडा शर्यत आणि यात्रा-जत्रा हे ग्रामीण भागातीली यात्रांचे खरे समीकरण. मात्र बैलगाडी शर्यतीला न्यायालायने ...
- शिवाजी आतकरी
खेड : बैलगाडा शर्यत आणि यात्रा-जत्रा हे ग्रामीण भागातीली यात्रांचे खरे समीकरण. मात्र बैलगाडी शर्यतीला न्यायालायने घातलेल्या बंदीमुळे हे समीकरण विस्कटलेले आहे. सध्या दुष्काळ, शेतमालास कवडीमोल भाव, आणि बैलगाडा शर्यत अभावी रोडावलेल्या यात्रा या सर्वांचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
यात्रा होत नसल्यामुळे आर्थिक उलाढालीचा आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा आर्थिक कणा बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे मोडला आहे. बैलगाडा शर्यतबंदीचा वाद न्यायप्रविष्ट असला तरी बैलगाडा शौकिनांचे आणि छोट्यामोठ्या व्यावसायिकांचे डोळे यात्रा जत्रांच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीकडे लागले आहे.
पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यात बैलगाडी शर्यत म्हणजे मोठा इव्हेंट होत असे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असे. त्यामध्ये वाहतूक करणाऱ्या वाहनांना काम मिळत असे. तसेच यानिमित्ताने होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांचे स्टॉल, विविध साहित्याचे वितरक, विविध खेळाचे साहित्य इथपासून ते मंडप- लाऊड स्पीकरवाला या सर्वांच्या हाताला काम मिळत असे. चांगला रोजगार यातून उपलब्ध होत असे. त्यातून चांगली उलाढाल होत असे. या सर्व उलाढालीचा सकारात्मक परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊन त्यास चालना मिळत होती.
शर्यतीच्या बैलांच्या किमतीही त्यामुळे वाढल्या होत्या. बैलव्यापारालही त्यामुळे चालना मिळत होती. बैलगाडा घाटात समालोचन करणाऱ्यांंनाही सुगीचे दिवस आले होते. बैलांना चुकून इजा झाल्यास शेतकºयांना भुर्दंड नको म्हणून विमा कंपन्यांची सुरुवातही झाली होती. त्यामुळे एकूणच यात्रा आणि बैलगाडा शर्यत हे समीकरण झाले होते. त्यातून होणारी रोजगारनिर्मिती पाहता ग्रामीण अर्थव्यस्थेला चालना मिळून एक समाधानी व उत्साही वातावरण यात्रांच्या निमित्ताने पाहण्यास मिळत होते. दरम्यान काही संघटनांनी यावर आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतल्याने शर्यतीस ब्रेक लागला. एरव्ही राजकीय विरोधक असणारे बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करू लागले. त्यात यश आले नाही. बैलगाडा शर्यत हा विषय न्यायप्रविष्ट आहे. या शर्यती सुरू झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सध्या तरी बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे यात्रा जत्रा ओस पडत आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एकप्रकारे खीळ बसली आहे.
दुष्काळात तेरावा महिना
सध्या दुष्काळाची गदड छाया संपूर्ण जिल्ह्यावर आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ््यात दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे किमान गावातील अर्थव्यवस्थेला तारणारी बैैलगाडीची शर्यत सुरु व्हावी यासाठी न्यायालयात एकजुटीने लढण्याचा मानस गावकºयांनी केला आहे. मात्र न्यायालयाने याला परवानगी दिली नाही तर बैैलांची शर्यत थांबेल मात्र गावकºयांना पुन्हा त्यांच्या पोटासाठी आणि जगण्यासाठी धावाधाव करावी लागेल.