मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या या पत्रात म्हटले आहे की, बँकेच्या व्याजदरात घसरण झाल्याने कल्याण निधीच्या मुदत ठेवीवरील व्याजातून मिळणा-या रकमेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे सन्मान योजना असेल किंवा आरोग्य योजनेचा लाभ देताना हात आखडला जात आहे. निधी कमतरतेचे कारण सांगून अधिकारी अनेक पात्र ज्येष्ठ पत्रकारांचे अर्ज नाकारत आहेत. येत्या अधिवेशनात सरकारने यासंबंधीचा निर्णय घेतला नाही तर राज्यातील पत्रकार मोठे आंदोलन करतील, असा इशाराही नाईक यांनी दिला आहे. पेन्शन योजनेच्या जाचक अटीमुळे अनेक पत्रकार योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ देताना वयाची मर्यादा ५८ वर्षे करावी तसेच अनुभवाचा कालावधी २५ वर्षांचा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिस्वीकृतीचे अर्ज मंजूर करताना देखील मोठ्या प्रमाणात पक्षपात होत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. पत्रावर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
सर्व पात्र ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शनयोजनेचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:11 AM