पुणे : पाऊस आल्याने आडोशाला जाणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. सोसायटीच्या कम्पाऊंडच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.
अजयकुमार विनोदकुमार वर्मा (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील ब्रह्मा इस्टेट सोसायटीत तारेच्या कम्पाऊंडशेजारी गुरुवारी रात्री पावणे आठ वाजता घडली. याबाबत अजयकुमार यांचे वडील विनोदकुमार फिरारीराम वर्मा (वय ५०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार विनोदकुमार वर्मा हे कामानिमित्त बाहेर गेले होते. ब्रह्मा इस्टेट सोसायटीजवळून जात असताना जोराचा पाऊस आल्याने ते स्वत:चा बचाव करण्यासाठी सोसायटीच्या कम्पाऊंडलगत आडोशाला जाऊन थांबले. त्यावेळी त्यांचा हात कम्पाऊंडच्या तारेला लागला. त्या तारेत वीज प्रवाह उतरला होता. या विजेचा धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यू झाला.
सोसायटीच्या मीटरमधून वायर काढून गेटजवळ बल्ब लावण्यात आला होता. त्याची वायर कम्पाऊंडच्या तारेला लागली होती. त्यामुळे या तारेत वीज प्रवाह उतरला होता. त्याचा वर्मा यांना धक्का बसला व ते जागेवरच कोसळले. रात्रीची वेळ असल्याने कोणाचेही त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. कोणीतरी दारू पिऊन पडला असल्याचे सुरुवातीला वाटले होते. कोंढवा पोलिस तपास करत आहेत.