सावधान! माेबाइल हॅक अन् खाते हाेईल रिकामे; पार्सल आलाय काॅल करा, असे सांगत होऊ शकते फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 09:28 AM2024-01-17T09:28:18+5:302024-01-17T09:29:40+5:30
गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे मेसेज येण्याचे प्रमाण वाढले असून, सायबर पोलिसांकडे गेल्या दोन दिवसांत पाच ते सहा तक्रारी आल्या आहेत...
- नम्रता फडणीस
पुणे : कुणी तुम्हाला फोन करून पोस्टाचे किंवा बँकेचे कुरिअर आले आहे. त्यासाठी कुरिअर बाॅयला फोन करा, असे म्हणत मोबाइल क्रमांक पाठविला असेल तर सावधान! कारण संबंधित कुरिअर बाॅयला फोन केलात तर तुमचा फोन हॅक झालाच म्हणून समजा. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे मेसेज येण्याचे प्रमाण वाढले असून, सायबर पोलिसांकडे गेल्या दोन दिवसांत पाच ते सहा तक्रारी आल्या आहेत.
अचानक तुमच्या मित्र-मैत्रिणीच्या नावाने व्हाॅट्सॲपवर एक मेसेज येतो आणि तुमच्याकडे ४५ हजार रुपये पाठविण्याची विनंती केली जाते. या मेसेजला प्रतिसाद देऊन पैसे पाठवायचा विचार केलात तर फसाल! सायबर चोरट्यांनी तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या व्हाॅट्सॲप क्रमांकाचा ॲक्सेस मिळवल्याने त्यांच्या संपर्क यादीतील सर्वांना एकाचवेळी असे मेसेज पाठविले जात आहेत. अशा प्रकारचे मेसेज ओळखीच्याच व्यक्तींकडून आल्याने सर्वजण धास्तावले आहेत.
आर्थिक फसवणुकीसाठी सायबर चोरटे दररोज नवनवीन फंडे शोधत आहेत. टास्क फ्राॅड आणि फेसबुक हॅक करून पैशाची मागणी करणाऱ्या मेसेजचा फंडा आजमावल्यानंतर आता पोस्ट किंवा बँकेचे कुरिअर आले आहे, असा फोन करून व्यक्तींच्या व्हाॅट्सॲपचा ॲक्सेस करून आर्थिक फसवणुकीची नवीन क्लृप्ती शोधली आहे.
जनसंपर्क व माध्यम क्षेत्रात कार्यरत दोन महिलांसह एकाच्या नावाने त्यांच्या काॅन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना मेसेज सुरू झाले. सायबर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल हॅक केला आणि एका वेगळ्याच नावाने यूपीआय आयडी देऊन पैशाची मागणी केली. त्यांनी सायबर पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदविली आणि सोशल मीडियावरही या प्रकाराची माहिती देऊन सर्वांना अशाप्रकारचे मेसेज आल्यास सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
तुमचे एक कुरिअर आले आहे, असा फाेन मला ऐन कामाच्या वेळेस आला. मग मी त्या व्यक्तीला घरी पाठवा असे म्हणाले. तो हिंदीमध्ये बोलत होता. एक माणूस कुरिअर द्यायला येणार आहे. त्याला तुम्ही फोन करा, असे सांगून त्याने मला मेसेज करून एक क्रमांक पाठवला. मी त्या नंबरवर काॅल केला; पण लागला नाही. त्याने *401# असे करून क्रमांक डायल करायला सांगितला आणि तसे केल्यानंतर त्या व्यक्तीचा फोन लागला; पण कुणीच बोलले नाही. माझे इनकमिंग काॅल्स बंद झाले. तोवर माझ्या काॅन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना मेसेज गेले होते. आता माझं व्हाॅट्सॲप बंद झाले आहे. मी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. कुणाला माझ्या व्हाॅट्सॲप क्रमांकावरून असे मेसेज आले असतील तर त्यांनी शेजारील तीन डाॅटवर क्लिक करून रिपोर्ट करा.
- तक्रारदार महिला
कुरिअर आल्याचा एक फोन येतो आणि *401# नि एक मोबाइल क्रमांक टाकायला सांगितला जातो. त्यामुळे तुमचे फोन आणि मेसेजेस त्या दिलेल्या क्रमांकावर फाॅरवर्ड होतात. त्यानंतर तुमचे व्हाॅट्सॲप दुसरीकडे सायबर चोरटे ॲक्सेस करतात. अशा प्रकारे व्हाॅट्सॲप हॅक होत आहे. पैशाची मागणी करणारा ओळखीच्या क्रमांकावरून मेसेज आला तर तातडीने रिपोर्ट करा आणि क्रमांक ब्लाॅक करा. दोन ते तीन दिवसांपासून अशा तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कुणीही सांगितले तरी *401# हा क्रमांक आणि त्यांनी सांगितलेला क्रमांक डायल करू नका.
- मीनल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर
चॅटिंग करणारा निघाला सायबर चोरटा
काही व्यक्तींना व्हाॅट्सॲप क्रमांकावर पैशाची मागणी करणारे मेसेज आले. खातरजमा करण्यासाठी त्यांनी त्या क्रमांकावर चॅटिंग केले. आम्ही इतके पैसे पाठवू का? वगैरे विचारणा केली. त्या मेसेजला सायबर चोरटा चॅटिंगद्वारे प्रतिसाद देत होता, असेही सांगण्यात आले आहे.