सावधान...! रस्त्यावर कचरा टाकाल तर होणार दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:36 PM2017-10-27T18:36:29+5:302017-10-27T18:46:34+5:30
वारंवार सूचना देऊन, फलक लावून देखील वारजे-माळवाडी येथील प्रभाग क्रमांक ३२ मधील गणेशपुरी सोसायटीच्या रस्त्यावर कचरा टाकणार्यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर महापालिकेच्या वतीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे.
पुणे : नागरिकांना वारंवार सूचना देऊन, फलक लावून देखील वारजे-माळवाडी येथील प्रभाग क्रमांक ३२ मधील गणेशपुरी सोसायटीच्या रस्त्यावर कचरा टाकणार्यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर स्थानिक नगरसेविका सायली वांजळे यांनी परिसरातील लोकांच्या घरोघरी जाऊन प्रबोधन केले. वॉर्ड आॅफिसचे अधिकारी व स्वच्छ संस्थेच्या कर्मचार्यांना बरोबर घेऊन वेळोवेळी परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर देखील काही प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने अखेर महापालिकेच्या वतीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे.
वारजे-मावळवाडी येथील हा रस्ता गणपती माथा व गणेशपुरी रामनगर परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा रस्ता आहे. यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. परंतु लगतच्या सोसायट्यांमधील नागरिक जाता-येता या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. यात प्रामुख्याने रात्रीच्या वेळी शतपावलीसाठी बाहेर पडणार्या महिला वर्ग किंवा सकाळी कामावर जाताजात गाडीवरून रात्रीचे उरलेले शिळे अन्न, कपडे, भाज्या आदी सर्वच प्रकारच्या कचर्याच्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या दररोज येथे टाकल्या जात. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना व कचरा टाकणार्या सोसायटीतील लोकांना देखील या कचर्यामुळे निर्माण होणार्या दुर्गंधीचा प्रचंड त्रास होता. या रस्त्यावरील कचर्याची ही स्थिती पाहिल्यानंतर नगरसेविका वांजळे यांनी तातडीने संबंधित वॉर्ड आॅफिसच्या अधिकार्यांशी संपर्क करून परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली. अधिकार्यांना सांगून वांजळे थांबल्या नाही तर त्यांनी परिसरातील सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन रस्त्यावर कचरा न टाकण्या संदर्भांत जनजागृती केली. तसेच वांजळे स्वत: स्वच्छ संस्थेच्या कर्मचार्यांसोबत उभ्या राहून हा परिसर स्वच्छ करून घेतला. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन कचरा टाकणार्यावर देखरेख देखील ठेवण्यात येते. त्यानंतर देखील काही प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने अखेर महापालिका प्रशासनाने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला असून, कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांची मानसिक्त बदलण्याची गरज
गणेशपुरी रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून कचर्याचे ढिग साठलेले होते. या परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणार्या लोकांकडून हा कचरा रस्त्यावर टाकला जात होता. याबाबत जनजागृती करून, सूचना फलक लावून देखील फारसा फरक पडला नाही. यामुळे अखेर येथे सीसीटीव्ही बसविण्याची वेळ आली. कचरा रस्त्यावर टाकल्याने परिसरातील नागरिकांनाच त्रास होतो. यामुळे कचरा रस्त्यावर न टाकण्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.
- सायली वांजळे, नगरसेविका