असंख्य दिव्यांनी उजळला भीमाकाठ
By admin | Published: November 15, 2016 03:34 AM2016-11-15T03:34:15+5:302016-11-15T03:34:15+5:30
येथील भीमानदी काठावरील कार्तिकेयस्वामींच्या मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या असंख्य पणत्यांनी भीमाकाठ आणि मंदिर परिसर
राजगुरुनगर : येथील भीमानदी काठावरील कार्तिकेयस्वामींच्या मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या असंख्य पणत्यांनी भीमाकाठ आणि मंदिर परिसर उजळून निघाला होता. राजगुरुनगर भाविकांनी त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. विशेषत: महिला वर्ग भीमानदी काठावरील कार्तिकेय मंदिरात आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कार्तिकेय मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने जमला होता.
भीमानदी काठावरील कार्तिकेय मंदिराच्या परिसरात कार्तिकेयभक्तांनी आणि भाऊ राक्षे मित्र मंडळाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हा दीपमहोत्सव आयोजित केला होता. त्यासाठी शंभरावर भक्तगण त्रिपुर वातींनी तेलाच्या पणत्या लावण्यासाठी झटत होते. त्यानंतर रात्रीचा अंधार पसरताच दिव्यांनी हा भीमाकाठ उजळून निघला. येथील स्मशानभूमीही दिव्यांनी उजळून निघाली होती. भाविकांनी भीमा नदीत पणत्या सोडल्या.
येथे अनेक भाविकांनी कार्तिकेयस्वामींचे दर्शन घेतले. त्यांत महिला अधिक होत्या. कारण फक्त आजच्या दिवशीच महिलांना कार्तिकेयस्वामींचे दर्शन घेता येते, अशी परंपरा आहे. कार्तिकस्वामींचे मोर हे वाहन असल्याने मोराची पिसे कार्तिकेय स्वामींसमोर ठेवून नंतर घरी नेऊन पूजा करून जपून ठेवले जाते. त्यामुळे धनसंपदा लाभते, अशी श्रद्धा आहे. सकाळी कार्तिकेयांची महापूजा आणि अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. भाविकांसाठी भाऊ राक्षे मित्र मंडळाने महाप्रसादाचे आयोजनही केले होते. पौराणिक सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या कार्तिकेयस्वामी मंदिरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त सकाळपासून गर्दी होती. असंख्य महिलांनी मोराचे पीस वाहून दर्शन घेतले. भागीरथी कुंड आणि मंदिर परिसर हजारो पणत्या लावून उजळून काढला. सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने हा दीपसोहळा आयोजित करण्यात आला होता. ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ सांडभोर यांनी व्यवस्था पाहिली.