भादलवाडी तलावाने तळ गाठला, पाण्यासाठी होतेय पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:36 AM2018-11-13T01:36:24+5:302018-11-13T01:36:40+5:30
पाण्यासाठी पायपीट : तलावात पाणी सोडण्याची मागणी
पळसदेव : पळसदेव परिसरातील भादलवाडी तलावाने तळ गाठला आहे. यामुळे या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या तलावात पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. पाऊस पडेना, तलावात पाणी येत नाही, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पश्चिम भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उभी पिके जळून गेली आहेत. रात्री कडाक्याची थंडी अन् दिवसा कडक ऊन अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. विहिरीतील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत.
तलावात पाणी नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. ऊसपिकाला अधिक फटका बसला आहे. सध्या खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्या आशेवर शेतकरी बसला आहे. मात्र तलावांमध्ये पाणी काही येत नाही. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलावात पाणी सोडण्याबाबत जलसंपदा खाते दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तलावात पाणी सोडण्याबाबत निष्क्रिय आहेत. एकमेकांवर टीका करण्यापलीकडे त्यांना काही जमत नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या.
पाणीप्रश्न गंभीर बनला असताना त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हिवाळ्यात ही परिस्थिती तर उन्हाळ्यात काय होणार, याचा प्रत्यय आताच येऊ लागला आहे. गाय, म्हैस या जनावरांना चारा नसल्याने भटकंती करावी लागत आहे. वन्यप्राणी चारयासाठी व पाण्याच्या शोधार्थ सैरभैर फिरताना दिसतात. जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दुष्काळी परिस्थितीची जाण ठेवून तरी तलावांमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
भादलवाडी येथील तलावातील मच्छीमार चिंताग्रस्त
४भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर येथील मच्छीमार अवलंबून आहे. या तलावात सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून मत्स्यबीज सोडण्यात आले होते. मात्र पाणी आटल्याने हे मत्स्यबीज मृत्युमुखी पडत आहे.
४तसेच पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी शिकार ठरत आहे. तरी या तलावात पाणी सोडण्याची मागणी माजी सरपंच अशोक भंडलकर यांनी केली आहे.