पुणे : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या चिन्हवाटपात संपूर्ण भाजी मंडईच भरली आहे. भेंडी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, मका, वाटाणे यांसह १० फळभाज्या, ९ विविध प्रकारची फळे, ब्रेकफास्टचे बिस्किट, पाव, केक आणि व्हेज थाळीचा समावेश केला आहे. एवढेच नाहीतर, आइसक्रीमदेखील निवडणूक चिन्ह म्हणून उमेदवार घेऊ शकतो. याचबरोबर पेनड्राइव्ह, टीव्ही रिमोट, आधुनिक क्रेनसह तब्बल १९० चिन्हांची भलीमोठी यादीच दिली आहे.
जिल्ह्यातील ७,४६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ४ जानेवारी रोजी उमेदवारी माघारीनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वापट करण्यात येणार आहे. यात उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन निवडणूक चिन्हांत ४० ने वाढ करीत तब्बल १९० चिन्हांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना आपले निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविणे सहज शक्य होणार आहे.
ही आहेत नवीन निवडणूक चिन्हेग्रामपंचायत निवडणुकीत बहुतेक सर्व फळे व भाज्या, व्हेज थाळी, पाव, केकसह आधुनिक क्रेन, पेनड्राइव्ह, माऊस या काही चिन्हांचा नव्याने समावेश केला आहे.
पॅनल केले तरी वेगवेगळ्या चिन्हांवरच लढावे लागणार
ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी अनेक वाॅर्डातील उमेदवार एकत्र येऊन पॅनल करतात. ग्रामपंचायतींसाठी पॅनल केले तरी पॅनेलमधील सर्व उमेदवारांना वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार आहे.