माझ्या पदवीची चिंता भारतीय जनता पार्टीने करू नये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:08 PM2020-01-11T16:08:28+5:302020-01-11T17:31:29+5:30
माझ्या पदवीवरून टिका होते आहे, मात्र मला त्याचा अभिमान आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी ती पदवी लपवलेली नाही हेही लक्षात घ्यावे. उलट पुण्यात शिकायला मिळाले याचा मला आनंदच आहे.
पुणे: माझ्या पदवीची चिंता भारतीय जनता पार्टीने करू नये, मला पुण्यात शिकायला मिळाले याचा मला अभिमान आहे. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना असल्या फालतू विषयांवरून त्याच्यावर टिका करू नका, खात्यात काम कसे करतो आहे ते पहा असा सल्ला दिला आहे याकडे भाजपने लक्ष द्यावे असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर पदवीकरून टिका करणाऱ्या भाजपाला दिला.
मंत्रीपद स्विकारल्यानंतर प्रथमच सामंत पुण्यात आले होते. पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला त्यांनी भेट दिली. ते म्हणाले, ज्या पक्षाने मंत्री केले त्या पक्षाच्या शाखांना, जिल्हा कार्यालयाला भेट देणे, कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणे माझे कर्तव्य आहे. त्याप्रमाणे मी इथे आलो आहे. माझ्या पदवीवरून टिका होते आहे, मात्र मला त्याचा अभिमान आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी ती पदवी लपवलेली नाही हेही लक्षात घ्यावे. उलट पुण्यात शिकायला मिळाले याचा मला आनंदच आहे.
कोकण विद्यापीठाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तुम्ही कोकण विभागातीलच आहात, आता या प्रस्तावाला गती मिळेल का यावर सामंत म्हणाले, सोलापूरला तेथील ३८ महाविद्यालयांसाठी विद्यापीठ होऊ शकते तर कोकणात तेथील महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ का नको? ते व्हायलाच पाहिजे. कदाचित त्यामुळेच माझ्याकडे उच्च शिक्षण विभाग आला असावा. कोकण विद्यापीठ प्रत्यक्षात यावे यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणारच आहे.