भीमाशंकर कारखाना देशातील सर्वोत्कृष्ट, दिल्लीत पुरस्कार मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:07 AM2018-08-27T00:07:17+5:302018-08-27T00:07:42+5:30
सहकारी साखर कारखाना पुरस्कार : दिल्लीत वितरण
घोडेगाव : दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांचा सन २०१७-१८ करिता देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण १० सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व विद्यमान केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
आर्थिक वर्षात केलेले ऊसगाळप, साखर उतारा, ऊसवाढीच्या योजना, आर्थिक व्यवस्थापन, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी खर्चात उत्पादन, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊसदर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्तमूल्य, शिल्लक कर्जउभारणी मर्यादा, कारखान्याने उभारलेला व उपलब्ध निधी विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षणक्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकी या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार मिळाला आहे.
सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासदवर्गाची साथ यामुळे हा पुरस्कार मिळविणे शक्य झाले. यापूर्वी कारखान्यास देशपातळीवरील ९ व राज्यपातळीवरील ९ असे एकूण १८ पुरस्कार मिळाले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ४ वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर कारखाना आहे, अशी माहिती बाळासाहेब बेंडे यांनी दिली.