ब्लॅक मॅजिकच्या नावाखाली फसविणाऱ्या भोंदुबाबाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:39+5:302021-01-17T04:11:39+5:30
पुणे : तुमच्या घरावर काळी जादु केली असल्याचे सांगून घरांच्या जीवाची भिती दाखवून उपचारासाठी हरणाची कस्तुरी, धान्य आणून आघोरी ...
पुणे : तुमच्या घरावर काळी जादु केली असल्याचे सांगून घरांच्या जीवाची भिती दाखवून उपचारासाठी हरणाची कस्तुरी, धान्य आणून आघोरी विद्येसाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार कोंढव्यात उघड झाला आहे.
कोंढवा पोलिसांनी नईम मुस्तकीन सिद्दीकी (वय ४८, रा. हारुन मंजील, जीवनबाग, मुंब्रा, ठाणे) याला अटक केली आहे. सिद्दीकी याला आज न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२१ दरम्यान कोंढव्यातील शिवनेरीनगर येथे घडला आहे. जुन्नरमध्येही त्याने काही जणांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी शिवनेरीनगरमधील एका ३२ वर्षाच्या फिर्यादी तरुणाची पत्नी गेल्या ६ वर्षांपासून वारंवार आजारी पडत होती. फिर्यादी यांच्या भावाच्या मित्राने उपचारासाठी नईम सिद्दिकी याचे नाव सांगितले. नईम सिद्दिकी याने फिर्यादीच्या घरी येऊन नारळ फोडला. त्यातून केस, लाल कापड, मटणाची चरबी, लिंबु या गोष्टी निघाल्या. तेव्हा त्याने पत्नीच्या छातीत गाठ, मणक्यात दुखणे आहे, तुमच्या घरावर कोणीतरी काळी जादु केल्याचे सांगितले. उपाय म्हणून त्याने हरणाची कस्तुरी, मातीची हांडी, ७ प्रकारचे धान्य, लिंबु, अगरबत्ती, मोहरी, लाल मिरची असे १५ प्रकारचे साहित्य लागेल, असे सांगितले. हरणाची एक तोळा कस्तुरीसाठी ३५ हजार रुपये प्रमाणे घरातील तिघांसाठी ३ तोळे कस्तुरीसाठी १ लाख ५ हजार रुपये खर्च सांगितला. त्याप्रमाणे नईम याने पुजा केली. अशाच प्रकारे नईम सिद्दिकी याने आणखी दोन घरी जाऊन पुजा केली. त्यांच्याकडून एकूण २ लाख ७० हजार रुपये घेतले. पण पुजा करुनही फिर्यादी यांच्या पत्नीच्या तब्येतीत फरक पडला नाही. तेव्हा त्याने आणखी २ कस्तुरी लागतील, असे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांना संशय आला. हे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी नईमकडे पैसे परत मागितल्यावर त्याने फिर्यादीच्या खात्यात १ लाख रुपये ट्रान्सफर केले व उरलेले पैसे घेऊन पत्नी येत असल्याचे सांगितले. परंतु, त्याची पत्नी आली नाही. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. यु. कापरे यांनी शिवनेरीनगर येथे नईम आल्याचे समजल्यावर त्याला अटक केली.
अन त्याचा पर्दाफाश झाला
फिर्यादीच्या भावाच्या ओळखीच्या एका कुटुंबाकडे नईम सिद्दिकी गेला. त्यांना तुमची साडेसाती सुरु आहे. त्यांना कधीही मुले होणार नाही, असे सांगितले. परंतु त्यांचे लग्न झाले असून अगोदरच दोन मुले झालेली आहेत. त्यामुळे नईम हा हातचलाखी करुन काळ्या जादुच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.