लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : वादळी वाऱ्यासह पावसाने भोर तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडली. विजेचे खांब पडले आणि तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण कंपनीकडून वीजखांब उभारणे व तारा बसण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. भोर तालुक्यात शनिवारी आणि रविवारी पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे भोर- महाड रस्त्यावरील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. तर राजा रघुनाथराव विद्यालयातील जुने अनेक वर्षांपासून असलेले आंब्याचे झाड पडले. अनेक भागात वादळी वाऱ्याने झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले. दरम्यान, वादळी वाऱ्यासह पावसाने वीज वितरण कंपनीचे पिसावरे, नांदगाव, वरचे नांद, धावडी, बाजारवाडी, मानकरवाडी टिटेघर येथील उच्चदाब वाहिनीचे दोन खांब तर लघुदाब वाहिनीचे ९ असे ११ खांब कोसळले. तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण कंपनीकडून खांबाची व तारांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून वीजपुरवठा सुरळीत होईल असे वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता संतोष चव्हाण यांनी सांगितले. भोर तालुक्यात दोन दिवस पाऊस झाला नाही. मात्र, दिवस-रात्र वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली.
फोटो :