पुणे : मेट्रोबरोबरच आता पुणे शहरात सायकलही धावणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने संख्याबळाच्या जोरावर सायकल शेअरिंग व आरोग्य उपविधी हे दोन्ही विषय मंजूर करून घेतले. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी गोंधळ घालून त्यावर चर्चा करण्याची संधी गमावली.शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरांसमोरचा राजदंड पळवला व सभागृहाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्या सदस्यांनी तो पुन्हा ताब्यात घेतला. महापौर मुक्ता टिळक यांच्याभोवती सरंक्षक कडे करून शिवसेनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सभेची सुरुवातच विरोधकांनी गोंधळात केली. काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी २४ तास पाणी योजनेच्या सल्लागार कंपनीवर कारवाई करण्याबाबत सांगण्यात येणार होते त्याचे काय झाले, याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. मागील सभेत तसे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर मुक्ता टिळक यांनी त्यावर ही सभा विशेष सभा आहे, त्यात दुसरा विषय घेता येणार नाही, असे सांगितले. तरीही शिंदे यांनी खुलाशाचा आग्रह धरला.महापौरांनी त्याला नकार देताच शिंदे, आबा बागुल, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, संजय भोसले व अन्य विरोधी सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोरील जागेत जमा होऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. अखेरीस महापौरांनी आयुक्त खुलासा करतील; मात्र त्यावर प्रश्न विचारता येणार नाही, असे सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांनी संबधित संस्थेला नोटीस दिली असल्याचे स्पष्ट केले व त्यांचे म्हणणे समजल्यावर कारवाई करू, असे सांगितले. त्यानंतर विषयाचा पुकारा होताच तुपे यांनी दोन्ही विषयांचे सादरीकरण फक्त सत्ताधारी पक्षालाच का केले, अशी विचारणा केली. आम्हालाही विषय समजलेला नाही, सादरीकरण करावे; त्यासाठी सोमवारपर्यंत सभा तहकूब करावी, अशी मागणी त्यांनी केली. शिंदे, भोसले व अन्य सदस्यांनीही त्याला दुजोरा दिला.मुक्ता टिळक, मुरलीधर मोहोळ, श्रीनाथ भिमाले यांनी त्यांना विषय ऐकून त्यावर चर्चा करा, असे सांगितले. बागुल यांचे नावही पुकारले. सादरीकरणाची त्यांची मागणीही मान्य करण्यात आली; मात्र आता सादरीकरण नको, चर्चाच करू, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. त्यावरून पुन्हा गोंधळ सुरू झाला. त्यातच तुपे यांनी तहकुबीची सूचना वाचली. तिच्यावर काहीही निर्णय न घेता महापौरांनी थेट सभेचे कामकाज सुरू केले. त्यामुळे विरोधकांनी ‘तहकुबी फेटाळा व मतदानाला टाका,’ अशी मागणी केली. महापौरांसमोर गर्दी असतानाच शिवसेनेचे भोसले यांनी मधे घुसून राजदंड पळवला. तो प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रवादीच्या पठारे यांच्या हातात दिला.भाजपाचे अमोल बालवडकर, राजेंद्र शिळीमकर यांनी राजदंड घट्ट धरून ठेवला. भाजपाच्या महिला सदस्यही तिथे आल्या व राजदंड पुन्हा महापौरांसमोर नेऊन ठेवला. दरम्यानच्या काळात महापौर टिळक व भिमाले यांच्या सांगण्यावरून नगर सचिव राजेंद्र शेवाळे यांनी सायकल शेअरिंगचा विषय पुकारला.तो मतदानाने मंजूर केला. लगेचच आरोग्य उपविधीचाही विषय घेण्यात आला. त्यालाही हात वर करून मतदान घेण्यात आले व ‘दोन्ही विषय मंजूर’ असे म्हणत सभेचे कामकाज संपविण्यात आले.
मेट्रोबरोबरच धावणार सायकलही, महापालिकेत मंजुरी, विरोधकांचा गोंधळ, राजदंड पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 4:12 AM