पुणे (धनकवडी) : डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अलिकडेच जो बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. तसेच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बायडेन यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांची निवड झाली. भारतीयांसाठी ही कामगिरी नक्कीच अभिमानास्पद होती. याच गोष्टीचा अभिमान बाळगत पुण्यात याचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले आहे.
धनकवडी परिसरात जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारा व अभिनंदनपर असा भला मोठा बॅनर झळकला आहे. आणि तो जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ समोर कमला हॅरिस आणि भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांचे अभिनंदन करणारा मोठा फलक झळकला आहे. आणि हा फलक ज्या व्यक्तीने लावला त्यांचे नाव आहे पोपटराव खोपडे. खोपडे यांनी लावलेल्या फ्लेक्स येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे आकर्षणाचे कारण ठरले आहे. या फ्लेक्समधून त्यांनी आपल्या पुरोगामित्वाची व स्वदेशाभिमानाची ओळख करून दिली आहे.तसेच कोरोनामुळे ज्यांची हिंमत खचली आहे, त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य दिव्यांगाची कामगिरी पाहून पुन्हा उभारी घ्यावी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पोपटराव खोपडे मुळचे भोरचे असले तरी सध्या भारती विद्यापीठ परिसरात स्थाईक आहेत. शारिरिक हलचालीतील अक्षमता याप्रकारचे दिव्यांगत्व असले तरी त्यांनी दिव्यांगत्वावर मात करत १८०० किलोमीटर सायकल चालवली आणि विक्रम केला. त्याच्या विक्रमाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये नोंद झाली आहे. पण येवढ्यावर न थांबता त्यांनी 'शूर आम्ही सरदार' या भूमिकेतून आपल्या खोपटे घराण्याला शोभेल अशी कामगिरी केली. पोपटराव खोपडे यांनी घोड्यावर स्वार होऊन ५०० किलोमीटरची रपेट केली आणि या दरम्यांन ११ किल्ल्यांवर चढाई केली.
पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा आणि महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंची परंपरा जपताना पोपटराव खोपडे यांनी आणखी एक दिव्य केले. खोपडे यांच्या सुविद्य पत्नी. यांची किडनी निकामी झाली होती. किडनी प्रत्यारोपणासाठी हे दांपत्य तामिळनाडू येथे गेले. कोरोनामुळे तामिळनाडू येथे ते दोघे नऊ महिने अडकून पडले असताना व कोणाची मदत नसतानाही खोपडे यांनी आपली एक किडनी आपल्या पत्नीला दिली.
लोकमत प्रतिनिधीशी बोलताना खोपडे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महापुरुषांची परंपरा लाभली आहे. महापुरुषांच्या विचारांची पुरोगामी विचारसरणी लाभलेल्या महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्य कर्तव्यामुळे महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला आणि आज अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राच्या उपाध्यक्ष होण्याचा मान एका भारतीय वंशाच्या महिलेला मिळाला, एवढेच नव्हे तर त्या मंत्री मंडळात १२ मंत्री भारतीय आहे. ही बाब अभिमानास्पद असल्याने मी बला मोठा बँनर (होर्डिंग) लावला.