पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत चालली असून शहरामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही घटले आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचे होण्याचे प्रमाण आठ दिवसांवरून १२० दिवसांवर गेले आहे. त्यामुळे प्रशासनालाही दिलासा मिळाला असून शहरातील कोरोना आटोक्यात येत असल्याचे हे सकारात्मक चिन्ह दिसत आहे.
शहरात राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी पुण्याचा आढळून आला. त्यानंतर दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतच गेली. जशी रुग्णांची संख्या वाढली तसे कोविड केअर सेंटर वाढविण्यात आले. विलगीकरण कक्ष वाढविण्यात आले. यासोबतच खासगी रुग्णालयांसोबत महापालिकेने करार करून अतिरिक्त खाटांची व्यवस्था केली. अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर आयसीयू आणि वेंटिलेटर वाढविण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वीच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जम्बो रुग्णालय उभारण्यात आले. तसेच बाणेर येथे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारण्यात आले. त्यामुळेही रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. पुणे महापालिका प्रशासन अहोरात्र या साथीच्या आजारांची मुकाबला करण्यात आघाडीवर होते. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ झाली. दिवसाकाठी दोन हजार रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले. या काळात रुग्णांच्या दुप्पट होण्याचा वेग हा आठ दिवसांवर आला होता आणि ही चिंतेची बाब होती. परंतु शासकीय यंत्रणांनी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण संख्या कमी होत गेली. गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या घटत गेली आहे.
मागील पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या पाचशेच्या आतच पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे शहरातील १० हजारपेक्षा अधिक खाटा रिकाम्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही घटले आहे. आता रुग्ण दुप्पट होण्याचा दर १२० दिवसांवर गेला आहे. ही सकारात्मक बाब असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं आणि योग्य काळजी घेतल्यास आणखी लांबणीवर जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.-------रुग्ण दुप्पट होण्याचा दर (डबलिंग रेट) १२० दिवसांवर गेला आहे. मधल्या काळात हे प्रमाण सात-आठ दिवसांवर आले होते. गणेशोत्सवानंतर आलेली लाट कमी झाली असून दिवाळी नंतर दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेतल्यास दुसरी लाट थोपविणे शक्य होईल.- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका