पिंपरी : मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती विकसित होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीमध्ये भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी साकारणार आहे. देशात कोलकत्ता आणि अहमदाबादनंतर आता महाराष्ट्रात ही नगरी साकारणार आहे. त्यासाठी दोनशे कोटींचे अनुदान मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयाच्या मदतीने चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टरजवळ २०१३ मध्ये पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क निर्माण करण्यात आला. हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असल्याने राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय यांच्या सहाय्याने सायन्स सिटी उभारण्यचा विषय पुढे आला होता. त्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे....................असा आहे उद्देश१) विविध वैज्ञानिक खेळण्यांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव निर्माण व्हावा.२) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे हा संकल्प.३) एकविसाव्या शतकातील कौशल्ये, जागतिक नागरिकत्व, उद्योग व उद्योजकता, बहु अनुशासनात्मक, अनुभवात्मक शिक्षण मिळवून देणे..........................दृष्टीक्षेपात...आवश्यक आठ एकर क्षेत्र उपलब्ध आहे. त्यापैकी एक एकर जागेत विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र आहे. उर्वरीत सात एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाचे विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारीत १९१ कोटी रुपये खर्चाचे विज्ञान अविष्कार केंद्र असणार आहे..................................... एकविसाव्या शतकातील भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून देशाला समृद्ध बनविण्याचे स्वप्न व दूरदृष्टी देऊन परिवर्तन करण्यासाठी विज्ञान विषयाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने हा प्रकल्प होणार आहे. त्यातून शहराची नवी ओळख होणार आहे. पिंपरी-चिंचवड सायन्सपार्कला मोठ्याप्रमाणावर नागरिक भेट देत असतात. सायन्स पार्क ही शहराची नवी ओळख बनली आहे. विज्ञान अविष्कार केंद्राने शहराचा लौकिक वाढणार आहे. - राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका. ...............विज्ञान केंद्रामुळे पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या केंद्राला वर्षाला सरासरी अडीच लाख विद्यार्थी भेट देतात. केंद्र सरकारच्या वतीने कोलकत्ता, अहमदाबाद येथे आता विज्ञान प्रकल्प आहे. अविष्कार नगरी उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. - प्रवीण तुपे संचालक; पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क.