लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे़. दरम्यान, तुलनेने मागणी कमी असल्याने बटाटा, कांदा, टोमॅटो, काकडी आणि घेवड्याच्या दरात घसरण झाली. तर, लसूण आणि हिरवी मिरचीच्या दरात १०-२० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि. ३) रोजी सुमारे ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यांतून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १० ट्रक गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेशातून मटार ३० ते ३५ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून ८ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ट्रक इतकी आवक झाली आहे. तर, स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १३०० ते १४०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ९ ते १०
हजार पेटी, भुईमूग शेंगा ५० ते ६० पोती, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, कांद्यामध्ये जुना कांदा २५ ते ३० ट्रक, तर नवीन कांदा १०० ट्रक इतकी आवक झाली.
--
भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर
कांदा २०-२५ ३०-५०
बटाटा १५-२५ २०-३५
टोमॅटो ०५-७ १०-१५
भेंडी २०-३० २५-४०
गवार ३९-४० ४०-५०
मिरची ३५-५० ४५-५५
कोथिंबीर ०७-१० १०-१५
मेथी ०७-०८ १०-१५
मटार १८-२० २५-३०
--
पालेभाज्या पुन्हा महागल्या
पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने व मागणीत वाढ झाल्याने मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई आणि चवळईच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मेथीच्या दरात ६ रुपये, शेपू २ रुपये, कांदापात एक रुपया, चाकवत २ रुपये, करडई एक रुपया आणि चवळईच्या भावात ४ रुपयांनी वाढ झाली. तर, आवकेच्या तुलनेत मागणी घटल्याने कोथिंबीर, राजगिरा आणि हरभऱ्याच्या दरात प्रत्येकी १ रुपया आणि पालकच्या दरात २ रुपयांनी घट झाली आहे. तर पुदीना, अंबाडी आणि चुकाचे भाव मात्र स्थिर आहेत.
- विलास भुजबळ, व्यापारी
---
कांदा, बटाटा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला
कोरोना आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचे कारण देत गेले आठ-दहा महिने कांदा, बटाट्याचे दर सतत वाढतच होते. कांदा, बटाटा किचनमध्ये सतत लागत असल्याने कितीही महाग झाला, तरी घ्यावाच लागतो. परंतु आता कांदा ३० रुपयांपर्यंत, तर बटाटा २०-२५ रुपये किलो मिळत आहे. हेच दर ६० ते शंभरी गाठली होती.
- छाया चिंचली, गृहिणी