पुणे : पुण्यासह राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला नसला तरी कुटुंबाच्या वैयक्तिक पातळीवर मात्र मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांच्या घरी गेल्यानेच शहर आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढली असा दावा महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने केला आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, दररोज बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील समाधानकारक असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.विभागीय आयुक्त राव यांनी पुणे आणि विभागीचा कोरोनाची सध्यस्थितीत आणि उपाययोजनाबाबत माहिती दिली.यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार आणि जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख उपस्थित होते. यावेळी राव यांनी सांगितले, गणेशोत्सवानंतर पुण्याचा पाॅझिटिव्हीटी रेट 30 टक्क्यांच्या पुढे गेला होता. परंतु हा पिक टाईम आता संपुष्टात येत असून, पुणे शहराचा पाॅझिटिव्हीटी रेट 26 टक्क्यांपर्यंत तर ग्रामीण भागाचा हाच दर 20-21 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत बेड्स ची मागणी आणि नागरिकांकडून येणारे फोन देखील खूप कमी झाली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु गणेशोत्सवानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून नागरिकांनी धडा शिकला पाहिजे. आगामी काळात नवरात्रोत्सव आणि दिवाळीत प्रचंड खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन देखील राव यांनी केले. पुण्यात गेल्या पंधरा दिवसांत एकूण ऑक्सिजन बेड्स च्या संख्येत तब्बल 900 पर्यंत वाढ करण्यात आली असून, यात 69 आयसीयु बेड्स वाढविण्यात आल्याचे विभागीय आयुक्त यांनी स्पष्ट केले. तसेच 2-3 ऑक्टोबर पासून ससून रुग्णालय देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. पुण्यातील जम्बो हाॅस्पिटल दोन दिवसांत पूर्ण 800 बेड्स च्या क्षमतेने सुरू होत असून, रुग्ण वाढतील तसे दाखल करून घेण्यात येईल असे राव यांनी सांगितले. ------मान्सून संपल्यानंतर पुण्यातील उद्याने सुरू करण्याबाबत विचार पुण्यात अद्याप ही सार्वजनिक ठिकाणे सरसकट सुरू करण्याची परिस्थिती नाही. सध्या मान्सून सुरू असून, कोरोना सोबतच इतर आजार देखील होण्याची शक्यता असते. तसेच सर्व उद्यानांमध्ये असलेल्या ओपन जिम्समुळे देखील कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच सध्या तरी उद्याने सुरू करण्याचा कोणताही विचार नाही, 'पण मान्सून हंगाम संपल्यानंतर याबाबत विचार करू असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 1:39 PM
गणेशोत्सवानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून नागरिकांनी धडा शिकला पाहिजे..
ठळक मुद्देशहरासह जिल्ह्यात रुग्णसंख्या होतीय कमी