पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, ढोल ताशांचा गजर अन् गुलालाची उधळण अशा जल्लोषात दरवर्षी लाडक्या गणरायाचे आगमन होते. जगभरात अत्यंत उत्साहात साजरा होणारा वैभवशाली गणेशोत्सव आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशभक्त, कार्यकर्ते या लाडक्या गणरायाची वर्षभर वाट पाहत असतात.
पण मागील वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने उत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचं आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचं आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत केलंय.
''खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. त्याला पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त माधव जगताप उपस्थित होते. शासन व प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून गणेशोत्सव साजरा करताना दोन कमानी व रनिंग मांडवाला परवानगी देण्याबाबत गिरीश बापट यांनी प्रशासनाशी चर्चा केली. पुण्यातील मंडळे सर्व नियम पाळून ऑनलाईन दर्शनाला प्राध्यान्य देणार असल्याचं यावेळी सांगितल आहे.''
पुणेकरांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी
''यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी, असेही मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.''
श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सपकाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन, नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी, विनायक कदम, सौरभ धोकटे आदी उपस्थित होते.