दुर्गम भागासाठी दुचाकी रुग्णवाहिका; पुण्यात हस्तांतरण समारंभ; आदिवासींना होणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:24 PM2017-12-06T13:24:06+5:302017-12-06T13:30:12+5:30
सामाजिक भान ठेवून आणि आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले.
पुणे : गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य यांसारख्या जीवनावश्यक सुविधादेखील उपलब्ध नाहीत. सामाजिक भान ठेवून आणि आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आहे. समाजातील इतरांनीदेखील अशा दुर्गम भागात प्रत्यक्ष जाऊन तेथील समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असे मत सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड, आदर्श मित्र मंडळ आणि पुणे पोलीस यांच्यातर्फे अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा मिळावी, यासाठी दुचाकी रुग्णवाहिका हस्तांतर समारंभाचे आयोजन स्वारगेट येथे करण्यात आले होते. या वेळी रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदित्य देवधर, रोटरी क्लब आॅफ पुणे वेस्टएंड चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, आदर्श मित्र मंडळचे कार्यकर्ते, परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रवीण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, अॅड. प्रताप परदेशी, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, दुचाकी रुग्णवाहिका बनविणारे सुदर्शन डोईफोडे, नितीन करंदीकर, उदय कुलकर्णी, महेश झुरळे उपस्थित होते.
दुर्लक्षित भाग
रवींद्र कदम म्हणाले, ‘गडचिरोली जिल्ह्यात अनेक संसाधने उपलब्ध असतानादेखील प्रस्थापित व्यवस्थेचे दुर्लक्ष झाल्यामुळे हा भाग अजूनही दुर्लक्षित आहे. तेथील स्थानिक जनता वेगवेगळ्या दुष्टचक्रात अडकलेली आहे. त्यांच्या या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’
गडचिरोलीमधील एका गावात रुग्णवाहिका न मिळाल्याने एका वडिलांनी स्वत:च्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटर चालत घरी आणला. ही घटना लक्षात घेऊन अशा घटना भविष्यात होऊ नयेत आणि तत्काळ आरोग्यसेवा मिळावी, यासाठी दुचाकी रुग्णवाहिकेची सुविधा पुण्यातून उपलब्ध करून दिली आहे.
- उदय जगताप