पुणे : ‘सुहाना सफर और ये मौसम हसीं, हमे डर है कि हम खो ना जाये कहीं’ अशा मधुमती या चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या या गाण्याने बिमल रॉय यांच्यावरील मधुमती पुस्तकातील आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते बिमल रॉय यांच्यावरील पुस्तकांचे प्रकाशन. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे बिमल रॉय फिल्म सोसायटी, पेंग्विन बुक, ग्रंथाली आणि आशय फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बिमल रॉय यांच्या उत्तुंग चित्रपट कारकिर्दीचा लेखाजोखा मांडणाऱ्या रिंकी रॉय भट्टाचार्य लिखित ‘द मॅन हू स्पोक इन पिचर्स’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या पुस्तकाचे ग्रंथाली प्रकाशित बिमल रॉय यांची मधुमती या सरोज बावडेकर अनुवादित मराठी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयचे संचालक प्रकाश मगदूम, ग्रंथालीच्या उषा मेहता, धनश्री धारप, लेखिका रिंकी रॉय भट्टाचार्य व सरोज बावडेकर आदी उपास्थित होते. या कार्यक्रमात दोन्ही पुस्तकातील उताऱ्याचे अभिवाचन व दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.यावेळी ग्रंथालीच्या उषा मेहता यांनी लेखिका सरोज बावडेकर यांची मुलाखत घेतली त्यावेळी बावडेकर म्हणाल्या, की मी लहानपणापासून चित्रपट पाहत आले आहे. मी कुठलाही चित्रपट असो आवड निवडीचा विचार न करता बघायला जात असे. या कारणामुळे मला चित्रपटाची आवड निर्माण झाली. बिमल रॉय यांचे चित्रपट मला अजूनही आवडतात, त्यांच्या अनेक चित्रपटातून शोषितांचा आणि सामाजिक लढा दिसून येतो. मधुमती हे इंग्लिश पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचावे यासाठी मी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला.कार्यक्रमात मोहन आगाशे यांनी लेखिका रिंकी रॉय भट्टाचार्य यांची मुलाखत घेतली तेव्हा भट्टाचार्य म्हणाल्या, की माझे वडिल बिमल रॉय हे कामाशी नेहमी संलग्न होते. ते कुठल्याही प्रकारचे व्यसन करत नसत. त्यांनी दारूला कधीही हात लावला नाही. पण कुठलेही काम मनापासून करण्याचे व्यसन त्यांना होते. त्याचे व्यक्तिमत्व अतिशय उत्तम आणि स्वभाव हा शांत होता. मी नऊ वर्षांची असताना आम्ही आमच्या परिवारासह मुंबईला आलो. त्यानंतर वडिलांनी चित्रपटाविषयी कामाला सुरुवात केली. आम्ही मध्यमवर्गीय घरात राहणारे होतो. बरेच लेखक, संगीतकार, दिग्दर्शक आमच्या या लहानश्या घरात भेटायला येत असे. कोलकाता येथे राहत असताना त्यांना चित्रपट निर्मिती करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याकाळात भारत पाकिस्तान फाळणी या कारणामुळे अयशस्वी ठरले. पण काही कालांतराने त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले आणि या शहरात त्यांना कामाला चालना मिळाली. मी २२ वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून दरवर्षी म्हणजेच ८ जानेवारीला त्यांच्या स्मृतिदिनाची आठवण म्हणून लिखाण करत आहे. कार्यक्रमात जुन्या आठवणी जाग्या करण्यासाठी शशी कपूर आणि दिलीप कुमार यांच्या गाण्यांची चित्रफित दाखवण्यात आली.
बिमल रॉय यांची ‘मधुमती’ मराठीत; राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 2:57 PM
ग्रंथाली प्रकाशित बिमल रॉय यांची मधुमती या सरोज बावडेकर अनुवादित मराठी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे करण्यात आले.
ठळक मुद्देमधुमती हे इंग्लिश पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचावे यासाठी मराठी अनुवाद केला : बावडेकरवडिलांच्या स्मृतिदिनाची आठवण म्हणून लिखाण करत आहे : रिंकी रॉय भट्टाचार्य