लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या पुणे जागेसाठी मंगळवारी (दि. १) आजवरच्या इतिहासातील सर्वोच्च मतदान झाले. उत्स्फूर्त मतदानामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याच्या पैजा रंगू लागल्या आहेत. प्रमुख लढत असलेल्या महाआघाडी आणि भाजपा या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते विजयाचा दावा करत आहेत. उमेदवारांच्या पोटात मात्र गोळा आला आहे.
दोन्ही निवडणुकांची मतमोजणी येत्या गुरुवारी (दि. ३) सुरु होणार आहे. मात्र उमेदवारांची प्रचंड संख्या आणि पसंतीच्या मतांची गणना यामुळे प्रत्यक्ष निकाल लागण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्त्यांना शुक्रवारपर्यंत (दि. ४) प्रतिक्षा करावी लागू शकते.
मंगळवारी पार पडलेल्या मतदानासाठी सकाळपासूनच उत्साह दिसून आला. पदवीधर मतदारसंघासाठी दुपारी चारपर्यंत कोल्हापुर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६०.२९ टक्के मतदान झाले होते. सर्वात कमी ३९.५१ टक्के मतदान पुण्यात झाले होते. सांगली, सातारा, सोलापुर या तिन्ही जिल्ह्यातही सरासरी ४९ ते ५२ टक्के इतके विक्रमी मतदान झाले.
शिक्षक मतदारसंघातही विक्रमी मतदानाचा कल कायम राहिला. दुपारी चारपर्यंत कोल्हापुर जिल्ह्यात विक्रमी ८२.१६ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातही दुपारी चारपर्यंत सर्वात कमी मतदान ५३.९८ टक्के इतके पुणे जिल्ह्यात झाले. सांगली, सोलापुर, सातारा जिल्ह्यांमध्ये सरासरी ७४ ते ७७ टक्के मतदान झाले.
मतदानाच्या टक्केवारीवरुन कोणताही अंदाज बांधणे अवघड झाले आहे. पदवीधर मतदारसंघात सर्वाधित मतदार पुणे जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ६११ होते. त्या खालोखाल कोल्हापुर जिल्ह्यात ८९ हजार ५२९ तर सांगली जिल्ह्यात ८७ हजार २३३ मतदार होते. या सर्वच जिल्ह्यात भरभरून मतदान झाले आहे. भाजपाची यंत्रणा पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्षम असल्याचे सांगण्यात येते. तर मातब्बर नेते असलेल्या सांगली, कोल्हापुरात महाआघाडीने जोर लावला होता.
चौकट
ही आहे शक्यता
-जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील सांगली-कोल्हापुर पट्ट्यात किती मते घेतात, तसेच संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे सोलापुर जिल्ह्यात किती मते घेतात याकडे दोन्ही प्रमुख उमेदवारांचे लक्ष आहे. पाटील आणि कोकाटे यांनी घेतलेली मते महाआघाडीस मारक ठरतील तर मनसे उमेदवार रुपाली पाटील यांना मिळणारी मते भाजपाच्या उमेदवारास अडचणीची ठरतील, असे सांगण्यात येते.
-शिक्षक मतदारसंघातील सोलापुर जिल्ह्यातील उमेदवार दत्तात्रय सावंत यांची उमेदवारी महाआघाडीचे प्रा. जयंत आसगावकर यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
चौकट
चुरस यांच्यात
-पदवीधर मतदारसंघात एकूण ६२ तर शिक्षक मतदारसंघात ३५ उमेदवार नशीब आजमावत आहेत.
-पदवीधरमध्ये खरा सामाना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींच्या महाआघाडीचे उमेदवार अरूण लाड आणि भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यात आहे.
-शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर विरुद्ध भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्यात प्रमुख लढत आहे.