Devendra Fadnavis ( Marathi News ) : महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्षामुळे चांगलीच गाजली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना कुटुंबातून आव्हान मिळालं आणि यंदाच्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. पवार कुटुंबातील या फुटीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात आहे. याबाबत आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पवार कुटुंबात फूट पाडून तुम्ही कालचक्र पूर्ण केलं आहे का, असा प्रश्न आज पुण्यातील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "आम्ही घर वगैरे फोडत नाही. आम्ही पवारसाहेबांचंही घर फोडलं नाही. मात्र संधी मिळाली तर ती संधीही आम्ही सोडत नाही आणि जे सोबत येतात त्यांना आम्ही सोबत घेतो. सोबत आला तर का आपण टाळायचं? शिवसेनेची ही परिस्थिती का आली तर ती फॅमिली फर्स्टमुळे आली आणि राष्ट्रवादीची ही परिस्थिती का आली तर फर्स्ट फॅमिली फर्स्ट या धोरणामुळे आली," असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे.
अजित पवारांनी का केलं बंड?
अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे की, " अजितदादांनी हा पक्ष पवारसाहेबांच्या सोबतीने उभा केला. पवारसाहेब नक्कीच त्या पक्षाचा चेहरा असतील, नेते असतील, मात्र जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदादांनी श्रम घेतले, त्यांना मान्यताही होती. आमदारही अजितदादांच्या पाठीशी होते. अशा परिस्थितीत अजितदादांना सातत्याने डावललं गेलं. त्यांना सातत्याने समोर करून तोंडावर पाडण्यात आलं आणि व्हिलन करण्यात आलं. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता आपला विचार होणार नाही, आपल्याला व्हिलन करण्यात येतंय. कारण त्यांना व्हिलन केल्याशिवाय दुसऱ्या कोणाला नेता होता येणार नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न होतो तेव्हा निर्णय घेतला जातो," असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कसा पलटवार केला जातो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.