भाजप सरकार शेतकरीविरोधी : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:31 PM2018-06-29T15:31:32+5:302018-06-29T15:54:48+5:30
ऊस आणि दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी टिळक चौक ते साखर संकुल दरम्यान मोर्चा काढण्यात आला.
पुणे : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून येऊन हे सरकार त्यांनाच विसरले आहे. शेतकरी विरोधी धोरण असणाऱ्या सरकारला शेतकरी घरी बसवतील, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.
ऊसउत्पादक आणि दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी टिळक चौक ते साखर संकुल दरम्यान मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते. या वेळी खासदार शेट्टी बोलत होते.
शेट्टी म्हणाले, ‘‘ दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. दुधाचे भाव कोसळलेले आहेत. त्यामुळे सरकारने लिटरमागे पाच रुपये थेट शेतकऱ्यांच्या नावावर जमा करावेत. या मागणीसाठी शेतकऱ्यांशी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र, सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी वेळ नाही.’’
ऊसासाठी किमान आधारभूत किंमत (एफआरपी) ठरली आहे. मात्र, राज्यातील अनेक साखर कारखानदारांनी एफआरपी दिलेली नाही. साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी खासदार शेट्टी यांनी केली.