भारताची महासत्तेकडे वाटचाल, जे ६० वर्षांत जमले नाही ते गेल्या दहा वर्षांत झाले: नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 09:23 AM2024-05-12T09:23:03+5:302024-05-12T09:23:08+5:30
भारत जगात तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा वाढविल्या. २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले. जे काँग्रेसला साठ वर्षांत जमलं नाही, त्याच्या तीन पट विकास गेल्या दहा वर्षांत झाला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मोहोळ उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, विकासकामे करताना पायाभूत सुविधा खूप महत्त्वाच्या असतात. गेल्या दहा वर्षांत सर्वत्र या सुविधा दिल्या गेल्या. त्यामुळे दळणवळण वाढले. वीज, पाणी, रस्ते यामुळे उद्योग वाढला आणि देशात रोजगार वाढला. आज देश विविध प्रकारच्या वस्तू आयात करण्यापेक्षा निर्यात करीत आहे. त्यामुळे भारत जगात तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनत आहे.