Corona Virus Pune: संचारबंदीला भाजपचा विरोध, अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 12:01 PM2021-04-03T12:01:38+5:302021-04-03T12:03:09+5:30
संचारबंदीचा आदेश पाळणार नसल्याचे केले आंदोलनातून जाहीर
जमावबंदी लागण्याच्या पहिल्याच दिवशी पुणे भाजप कडुन आंदोलन करण्यात येत आहे. संचार बंदी पीएमपीएमएल बंद करण्याच्या निर्णयांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. संचारबंदीचा आदेश आम्ही पाळणार नसल्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळिक यांनी यावेळी जाहीर केले.
खासदार गिरिश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळिक हे आंदोलन करत आहेत. पीएमपीएमएल च्या स्वारगेट जवळील ॲाफिस बाहेर हे आंदोलन होत आहे. मुळात या दोघांच्याच उपस्थितीमध्ये हे आंदोलन होणं अपेक्षित होतं. मात्र इतर कार्यकर्त्यांनी देखील येथे हजेरी लावली आहे.
आंदोलनाविषयी आपली भुमिका स्पष्ट करताना मुळीक म्हणाले “ सरकारने हा निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. पीएमपीएमएल वर अनेक सर्वसामान्य लोक अवलंबून आहेत. या बसेस बंद करण्याचा निर्णय योग्य नव्हता. तरी देखील हा निर्णय घेतला आहे. कारण नसताना संचारबंदी लावली आहे. या अर्धवट लॅाकडाउन चा परिणाम खुप मोठा होणार आहे. सरकारने ज्यांचे नुकसान होणार आहे त्यांना पॅकेज दिलं पाहीजे. त्यामुळे आम्ही संचारबंदीचा आदेश मोडणार आहोत.”
शहरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते पीएमपीएमएल बस स्टॅापवर आंदोलन करतील असे जाहीर करत खासदार गिरीश बापट म्हणाले “ लोकांना जायला न मिळण्याचे थेट परिणाम आर्थिक घडी विस्कटण्यावर होणार आहेत. जमावबंदी आम्हांला मान्य. पण संचारबंदी नाही. टेस्टींग वाढवा, ग्रुप करणाऱ्यांना दंड करा. पण फक्त सत्ता आहे म्हणून दहशत करणे योग्य नाही. सरकार जे करेल त्याला आम्ही मदत करु. कोरोना फक्त सरकारची जबाबदारी नाहीत. पण संचारबंदी आणि पीएमपीएमएल बंद करण्यास आमचा विरोध आहे.