मार्गासनी : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते वेल्हे तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या निधीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी संग्राम थोपटे यांच्या बहुचर्चित मंत्रीपदाबाबत भाष्य केले. बारामती लोकसभा मतदारसंघात प्रथम आलेल्या प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी थोपटे यांच्या मंत्रीपदाबाबत भाष्य करत आमदार थोपटे आणि समर्थकांना गुड न्यूजही दिली.
''स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळातील जागा भराव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. येत्या चार ते पाच महिन्यांत तुमच्या मनातील गोष्ट पूर्ण होईल असे पटोले म्हणाले आहेत. तर पुरंदर तालुक्यात भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात फेरयाचिका दाखल कराव्यात. आपला शत्रू भारतीय जनता पक्ष आहे, हेही लक्षात ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी यावेळी केले आहे.
पटोले म्हणाले, तुमच्या मनातील गोष्ट येत्या चार ते पाच महिन्यांत पूर्ण होईल. मी तर संग्राम थोपटे यांना मी म्हटलं आहे की, मी ज्या खुर्चीवर बसलो होतो, त्या खुर्चीवर तुम्हाला बसायचे असेल तर तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही. तुम्ही वाघासारखे आहात, तुम्हाला मैदानात राहायला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे, हे एकदा ठरवा. कारण, लढवय्या माणसाने मैदानातच राहिले पाहिजे. मी ज्या खुर्चीवर बसलो होतो, त्या खुर्चीवर मी हंटर मारत होतो. त्या खुर्चीच्या बाहेर मला येता येत नव्हते.
''ती खुर्ची सोडली आणि प्रदेशाध्यक्ष झालो, त्या माध्यमातून मला राज्यभर आपल्या पक्षाची भूमिका मांडता आली. त्यामुळे तुम्ही निर्णय करा, तुम्ही म्हणाल ती भूमिका आपण घेऊ, त्या कोणतीही अडचण नाही. भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात फेरयाचिका दाखल कराव्यात. काहीजण आम्हाला मुंबईत सांगत होते की तुमचे पुणे जिल्ह्यात दोन आमदार आहेत आणि त्या दोघांचे एकमेकांशी पटत नाही. पण आमचे पुरंदरचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप स्वतः म्हणतात की, तुम्ही संग्राम थोपटे यांना मंत्री करा. त्यामुळे येथे तर कुठेच वाद नाही. आपला शत्रू भारतीय जनता पक्ष आहे, हेही लक्षात ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी शेवटी केले.''