पुणे : भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाचे काम पाहणा-या मुंबई येथील एका पदाधिकाऱ्याविरुद्ध पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवसेनेचे उपशहर संघटक उमेश वाघ यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेन गजरिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर ट्विट करून त्याने ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वाघ यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले.