पुणे : लोकसभेच्या प्रचाराची धुळवड पुण्यात सुरू झाली असून भाजपने पहिली प्रचार सभा घेत आघाडी घेतली आहे. एकीकडे पुण्यात काँग्रेसचा उमेदवार ठरत नसताना भाजपने मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देत प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत भाजपच्या सभेला काही वेळात सुरुवात झाली आहे.आमदार मेधा कुलकर्णी यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघापासून सभेला सुरुवात झाली.यावेळी व्यासपीठावर भाजपसह शिवसेना, आरपीआय,शिवसंग्राम आणि रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.भाजपच्या पहिल्या सभेतच ओपनिंग बॅट्समन म्हणून बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी भाषण केले. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू झाली आहे.
दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र अद्यापही उमेदवारांची निवड झाली नसून नक्की बापट यांच्यासमोर कोण उभं राहणार याबाबत उत्सुकता आहे. सध्या तरी पक्षातील अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि अभय छाजेड यांच्या नावांची चर्चा आहे.मात्र उमेदवार कोण हेच माहिती नसताना प्रचार कोणाचा करायचा हेच माहिती नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही निराशाजनक वातावरण आहे.त्यामुळे पुण्यात भाजपने लढाईला सुरुवात केली असली तरी त्यांनाही विरोधी उमेदवार माहिती नसल्याने त्यांनीही थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच शाब्दिक हल्ला चढवल्याचे बघायला मिळाले.