पुणे : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्याविरोधात भाजपकडून टीका होऊ लागली आहे. काही मंत्र्यांनी त्यांच्या अटकेचीही मागणी केली आहे. तर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पटोलेंच्या या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसात जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
''मविआ सरकारचे मंत्री आणि त्यांचे नेते नेहमीप्रमाणे या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहेत. मात्र सरकारला त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, अन्यथा परिणाम तुमच्यासमोर असतील. मी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी पोलीसांत जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल करावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.''
पाटील म्हणाले, चोर तो चोर वर शिरजोर ! पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्याविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करणाऱ्या नाना पटोलेंनी किती खोटं रेटलं, तरी ते लपून राहणार नाही. आता कितीही नाटकं केली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे पटोलेंवर त्वरित कारवाई झालीच पाहिजे.
''खुद्द सुकळी गावाच्या ग्रामस्थांनीच हा दावा केला आहे की, मोदी नावाचा कोणताही गावगुंड आमच्या गावात नाही. राज्याचा प्रदेशाध्यक्ष असताना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन मोदींजींना मारण्याची भाषा करायची आणि अंगाशी आल्यावर सारवासारव करून बिळात लपायचं, हेच तुम्ही करू शकता ! गावगुंडं नेमकं कोण आहे, हे संपूर्ण गावाला माहीत आहे. त्यामुळे उगाच गावकऱ्यांची बदनामी करून स्वतःच्या चेहऱ्यावर पसरलेला खोटेपणा आता बाजूला सारून घ्या. कितीही पळवाटा काढण्याचं ठरवलं तरी तुम्हाला तुमच्या कुकर्मांची फळं आता भोगावीच लागतील असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला आहे.
''तर पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जिवाला धोका पोहोचवणं आणि महाराष्ट्रात पंतप्रधानांना मारण्याचे वक्तव्य करणं, हे मरण्या-मारण्याचे तुमच्या काँग्रेस पक्षाचेच संस्कार आहेत असाही ते म्हणाले आहेत.''