लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पतीची फसवणूक करून लाल कुंकू, मंतरलेले लिंबू, तांदूळ अंथरुणात टाकणे असे अघोरी प्रकार करून मांत्रिकाचे ऐकले नाही तर खानदानाचा नाश होईल, असे धमकावून तरुणाला ब्लॅकमेल करून १ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी पत्नीसह सासरच्याकडील १२ जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कोथरूडमधील कुंबरे पार्क सोसायटीत ११ मार्च २०२० पासून आतापर्यंत घडला आहे. याप्रकरणी भूगाव येथे राहणाऱ्या एका ४० वर्षांच्या तरुणाने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे पत्नीशी पटत नव्हते. त्यामुळे त्या माहेरी निघून गेल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांच्या तडजोड झाली. त्यानंतर सुमारे ६ वर्षे त्यांनी संसार केला. त्यानंतर मार्च २०२० मध्ये फिर्यादी यांच्या पत्नीने सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांची फसवणूक करून त्यांना लाल कुंकू, मंतरलेले लिंबू, तांदूळ अंथरुणात टाकणे असे अघोरी प्रकार केले. त्यांच्या ओळखीच्या देवबाप्पा नावाच्या मांत्रिकाकडे दिव्यशक्ती आहे. त्याचे ऐकले नाही तर तुझ्या खानदानाचा नाश होईल, असे धमकाविले. त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या.
पत्नी व तिच्या सासरकडील लोकांनी कट रचून संगनमत करून फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयाला ब्लॅकमेल करून १ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्याविरुद्ध तुझ्या पत्नीला खटले दाखल करायला सांगतो व फिर्यादी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीची सर्वत्र बदनामी केली.
फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांवर त्याच्या पत्नीने गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये कौटुंबिक हिसांचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर फिर्यादी याने न्यायालयात धाव घेऊन फिर्यादी दाखल केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी केळकर यांनी याप्रकरणी १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करून चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश कोथरूड पोलिसांना दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यानुसार त्याची पत्नी व तिचे आईवडील आणि इतर नातेवाईकांवर ३८३, ४२०, ५०३, ५०४, ४९९, ५०६, १२० ब, तसेच नरबळी, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड तपास करीत आहेत.