पुणे : कात्रज येथील गुजरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने सोमवारी (दि. ८) प्रसिद्ध केले होते. कात्रज येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.९) या परिसराची पाहणी करीत बिबट्याचे अस्तित्व असल्याचे मान्य केले. वन क्षेत्रातच बिबट्याचा वावर असून, नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये असे आवाहनही विभागाच्या वतीने केले आहे. कात्रजकडून जुन्या बोगद्याकडे जाताना, गुजरवाडी गावाचा फाटा लागतो. महामार्गावरुन सुमारे सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या आडबाजुच्या गोठ्याबाहेर रविवारी एका कुत्र्याला जनावराने नेल्याची माहिती लोकमत ला मिळाली होती. प्राणीमित्रांसमवेत त्याची शहानिशा केल्यावर या वृत्तात तथ्य आढळले. गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या सातत्याने दर्शन होत असल्याचे समोर आले. रविवारच्या घटनेनंतर सोमवारी (दि. ८) देखील बिबट्याने समर्थगड फौंडेशनच्या आवारातील तळ्यावर सायंकाळी सात ते सव्वासातच्या सुमारास हजेरी लावली. वनरक्षक स्वाती खेडकर व वनसेवक संभाजी धनावडे यांच्या पथकाने मंगळवारी या ठिकाणाची पाहणी केली. प्राणीमित्र अभिषेक खंडेलवाल व समर्थगड फौंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.तळ्याच्या काठाजवळ बिबट्याच्या पावलांचे ठसे वन विभागाच्या पथकाला आढळले. अंदाजे तीन वर्षे वयाचा हा बिबट्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याच बरोबर तळ्यावर तरस, भेकर, काळवीट, रानडुक्कर व मोराच्या पावलांचे ठसे आढळून आले. वाढता उन्हाळा व जंगलातील पाण्याच्या दुर्भिक्षामुळे बिबट्या तळ्यावर येत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. -- दोन महिन्यांपूर्वी गायीच्या वासराला मारलेबिबट्याचा वावर गेल्या दोन महिन्यांपासून वाढला असला तरी १३ जुलै २०१८ रोजी बिबट्याच्या पाऊल खूणा वनविभागाला मिळाल्या होत्या. त्यानंतर मात्र, बिबट्याचे दर्शन झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी समर्थगड फौंडेशनच्या आवारातील गायीच्या वासराला बिबट्याने मारले होते. जवळपास सहा फुटी तारेचे कुंपण पार करुन बिबट्या आत आला होता. त्याला वासराला नेता आले नाही. अर्धवट खाल्लेले वासरु आवारात आढळले. वासराच्या जवळ बिबट्याच्या पाऊल खूणा असल्याचे यावेळी दिसून आले होते. ---या परिसरामध्ये बिबट्याचे अस्तित्व आहे. त्यामुळे महिन्यापूर्वी ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांना जंगलात न जाण्याबाबत आवाहन केले आहे. ही बाब वरीष्ठांना कळविण्यात येईल. जंगल परिसरातच बिबट्या वावरत आहे. नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये, तसेच जनावरे चारण्यास नेऊ नये. -स्वाती खेडकर, वनरक्षक कात्रज