- हनुमंत देवकरचाकण : दहावीचा अपघातग्रस्त विद्यार्थी गणेश हाकेला रुग्णालयात पेपर लिहिण्याची बोर्डाची परवानगी मिळाली असून बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हाकेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. आज प्रसिद्ध झालेल्या लोकमत वृत्तामुळे दानशूर व्यक्तींचा गणेशच्या उपचारासाठी मदतीचा ओघ सुरु केला आहे. मुलाला रुग्णालयातच अभ्यासासाठी पुस्तके व पेपर लिहण्यासाठी साहित्य उपलब्ध करून दिले. परंतु २१ मार्च व २२ मार्च ला असणारे २ पेपर लिहण्यासाठी चाकण येथील परिक्षा केंद्रात जाण्यासाठी सदर मुलगा असमर्थ होता. म्हणून डॉ. विजय गोकुळे यांनी रुग्णालयातच पेपर लिहण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मोबाईल वरुन संपर्क केला असता त्यांनी त्वरित त्यांचे स्वीय सहाय्यक कापडणीस यांना तशा सुचना दिल्या. आणि आज गणेशने रुग्णालयातून पेपर लिहिला. गणेश हा भामचंद्र माध्यमिक विद्यालयाचा हुशार विद्यार्थी असून त्याला नववी मध्ये ८४ टक्के मार्क्स पडले आहेत.श्री शिवाजी विद्यामंदिरचे प्राचार्य अरुण देशमुख यांनी सदर मुलाची परीक्षा रुग्णालयातच घेण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ. गोकुळे, बापूसाहेब सोनवणे, दिलीप जाधव हे सर्व एसएससी बोर्ड पुणे चे विभागीय सचिव यांना पुण्यात जाऊन भेटले व गणेश हाके यास रुग्णालयात पेपर लिहण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी अर्ज केला. भामचंद्र विद्यालयाचे प्राचार्य व लोकमतचे पत्रकार संजय बोरकर यांनी त्वरित ईमेलवर अर्ज व इतर तांत्रिक बाबींची पुर्तता केली. शिक्षणमंत्री विनोद तावडे व एसएससी बोर्ड पुणे विभागीय सचिव दहिफळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या अमुल्य व तात्काळ सहकार्यामुळे गणेश हाके या विद्यार्थ्यांला १० वी चे उर्वरित पेपर रुग्णालयात लिहण्याची परवानगी मिळाली. व त्याचे शैक्षणिक वर्ष वाचले. रुग्णालयाच्या जवळच असलेल्या प्रेरणा विद्यालयाच्या केंद्रातील शिक्षक सुपरव्हिजन साठी देऊन गणेशने आज भूगोल विषयाचा पेपर सोडविला.
गणेश हाके या दहावीची बोर्डाची परीक्षा देणा-या एका गरीब मजुराच्या मुलाचा १९ मार्च रोजी चाकणला अपघात झाला होता. अपघातानंतर खंडु शिंदे यांनी सदर मुलास नजीकच्या रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेले. उजव्या पायाची दोन्ही हाडे मोडल्या मुळे त्याला प्लास्टर केले. व शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. परंतु गरीब परिस्थिती मुळे नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब सोनवणे, खेड तालुका एनसीपी डाॅक्टर्स सेल अध्यक्ष व सकल मराठा समाज खेड तालुका मुख्य संघटक डॉ विजय गोकुळे यांना मदतीसाठी आवाहन केले. व त्यामुळे डॉ गोकुळे यांनी त्यांचे मित्र डॉ अमित स्वामी यांना सदर मुलावरील शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्याची विनंती केली. नातेवाईकांकडे अँबुलन्स ला पैसे नसल्याने स्वतः डॉ गोकुळे व सोनवणे सर अपघातग्रस्त मुलास डॉ स्वामी हाॅस्पिटल ताथवडे येथे अॅडमिट करण्यास कारमधून घेऊन गेले. तिथे डॉ स्वामी यांनी डॉ गोकुळे यांच्या विनंतीवरून ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार सुरू केले.
या शस्त्रक्रियेकरिता हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब सोनवणे सर, दिलीप जाधव, आप्पासाहेब गवारे, संदीप परदेशी, लायन्स क्लबचे आर सी सुनील जाधव यांनी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दोन दिवस भरपूर धावपळ करून व दवाखान्यातील ओपीडीकडे व हॉस्पिटल कडे दुर्लक्ष करून एका गरजू व अपघात ग्रस्त मुलाचे दहावीचे शैक्षणिक वर्ष वाचविण्यासाठी जे प्रयत्न केले याचे आम्हाला खूप मानसिक समाधान मिळाले असून लोकमतचे वृत्त सोशल मीडिया मधून व्हायरल करताच अनेक दानशूर व्यक्तींनी मुलाच्या वडिलांच्या खात्यावर मदतीचा ओघ सुरु झाल्याचे डॉ. गोकुळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.