पुणे - बाबा भिडे पुलाजवळील नदीपात्रात सेल्फी काढताना शुक्रवारी नदीत पडून वाहून गेलेल्या दोघा तरुणांचे मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर हाती लागले. ओंकार तुपधर (वय १८) आणि सौरभ कांबळे (वय २०, दोघेही रा. ताडीवाला रोड) अशी या तरुणांची नावे आहेत. धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. तसेच शहरात पडलेल्या पावसामुळे नदी पात्रातील पाण्यात वाढ झाली होती. पाण्याला ओढही होती.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सौरभ आणि ओंकार हे सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरले होते. पण सेल्फी काढताना तोल जाऊन ते पाण्यात पडले व वाहून गेले. अग्निशमन दलाने तातडीने शोध कार्य सुरु केले. परंतु, रात्र झाल्याने दोघांचा पत्ता लागू शकला नाही. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि अग्निशमन दलाकडून शनिवारी दिवसभर शोधमोहीम सुरू होती. संगम पुलापर्यंत सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतु, दोघांचा तपास लागू शकला नाही. ताडीवाला रोड येथील तरुणही त्यांचा शोध घेण्यासाठी मदत करीत होते. रात्र झाल्याने शनिवारी शोधकार्य थांबविण्यात आले होते.
रविवारी सकाळी ८ वाजता शोध कार्य सुरू करीत असताना महापालिकेसमोरील टिळक पुलाजवळ एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. बाहेर काढल्यावर तो ओंकार तुपधर याचा असल्याचे आढळून आले. त्याचसुमारास संगम पुलाजवळ फिरत असणारे त्रिकोने यांना पुलाजवळील लोखंडी जाळीजवळ एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. त्यांनी अग्निशमन दलाला कळविले. सौरभ कांबळे याचा मृतदेह बाहेर काढला. पाण्यात बुडाल्यानंतर तब्बल ३८ तासानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत.