वधूराणी मोटारीच्या बोनेटवर, व्हिडीओ शूटिंग पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:14 AM2021-07-14T04:14:52+5:302021-07-14T04:14:52+5:30
पोलीस हवालदार एस. एल. नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वधू शुभांगी शांताराम जरांडे (वय २३), मोटार चालक गणेश ...
पोलीस हवालदार एस. एल. नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वधू शुभांगी शांताराम जरांडे (वय २३), मोटार चालक गणेश शामराव लवांडे (वय ३८, दोघे रा. सहकार कॉलनी, चक्रपाणी वसाहत, गणेश मंदिराजवळ, भोसरी, पुणे ) व व्हिडीओग्राफर तुकाराम सौदागर शेडगे (वय २३, रा. वाल्हेकरवाडी, आकुर्डी) आणि स्काॅर्पिओ गाडीमधील इतर इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटातही विशेष काळजी घेत सध्या अनेक ठिकाणी छोटेखानी विवाहसोहळे पार पडत आहेत. असे असले तरी आजकालच्या सोशल मीडियाच्या युगात लग्न सोहळ्यांचा ट्रेंड पूर्णतः बदलून गेला आहे. त्यातच आताच्या मुली बैलगाडी, घोडा, हॅलिकॅप्टरने लग्नमंडपात रॉयल एण्ट्री करू लागल्या आहेत. असे असताना आपल्या जीवितास धोका होवू शकतो हे त्या साफ विसरत आहेत.
मंगळवार (१३ जुलै) शुभांगी हिचा विवाह सासवड (ता. पुरंदर) परिसरातील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात होता. लग्नासाठी जात असताना उत्साहाच्या वधू दिवे घाटातून चक्क मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास करत असल्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक ए. एम. काटे यांना समजले. त्या सदर ठिकाणी सकाळी १०.३० पोहोचल्या असता त्यांना स्कार्पिओ गाडी (एमएच १२ बीपी ४६७८) चे ड्रायव्हर गणेश लवांडे हे हयगयीने अविचाराने स्काॅर्पिओ गाडी चालवून गाडीवर त्याचे नातेवाईक शुभांगी शांताराम जरांडे हिस बोनेटवर बसवून इतर लोक गाडीत बसून गाडी समोर मोटार सायकल (एमएच १४ बीजी ५२५९) यावर तुकाराम शेडगे हा व्हिडीओ शूटिंग करीत असताना मास्क न घातलेले मिळून आले. पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचा कॅमेरा जप्त केला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ए. एम. काटे करत आहेत.