यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय ! कोरोनावर मात केलेल्या आईला घरात घेण्यास मुलानेच दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:37 PM2021-03-24T12:37:56+5:302021-03-24T13:31:57+5:30
पोलिसांनी आईला पुन्हा दाखल केले रुग्णालयात..
धायरी: कोरोनामधून बरे झाल्यानंतर स्वतःच्या आईला घरात घेण्यास मुलाने नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे.
नऱ्हे परिसरात राहत असलेल्या ७० वर्षाच्या पार्वतीबाई (नाव बदलेले आहे) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्यांना सिंहगड रस्त्यावरील वडगांव खुर्द येथील लायगुडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पार्वतीबाईंना लायगुडे रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून बरे केले. आज मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला फोन करून तुमच्या आईला आज डिस्चार्ज देतो आहोत, असे सांगितले असता तुम्ही तिला इकडे आमच्या घरी पाठवू नका तिला तिकडेच कुठेतरी ठेवा, असे धक्कादायक उत्तर त्याने दिला. त्यानंतर डॉक्टरांनी वारंवार मुलाला फोन केले असता त्याने डॉक्टरांचे फोनच उचलणे बंद केले. डॉक्टरांनी ताबडतोब सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधून पार्वतीबाईंना पोलिसांसोबत रुग्णवाहिकेतून घरी पाठविले. त्यानंतर पोलिस मुलाच्या घरी गेले असता दरवाजाला कुलूप दिसले, पोलिसांनी मुलास संपर्क केला असता आम्ही बाहेर आलो असून आम्हाला यायला वेळ लागणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
रात्री उशिरापर्यंत पार्वतीबाईंना मुलाच्या ताब्यात देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते.मात्र त्यांचा मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तसेच घराला लॉक असल्याने पोलिसांनी त्यांना पुन्हा लायगुडे रुग्णालयात दाखल केले आहे.अजूनही आपला मुलगा येऊन आपल्याला घरी घेऊन जाईल अशी भाबडी आशा पार्वतीबाई यांना आहे.
..........
पोरासाठी आयुष्यभर कष्ट केले आता मात्र सोसावं लागतंय ...
पोराने घरी नाही घेतलं तर आश्रमात जाईन, तिथेच काम करून खाईन. मला काही नकोय... धनदौलत नकोय,पैसाअडका नकोय, आयुष्यभर कष्ट केले आता मात्र मला सोसावं लागतंय.. १० दिवसांपासून एकच साडी घालतेय, आई कशी आहे म्हणून मला धड मुलाने चौकशीसुद्धा केली नाही. १५ वर्षांपासून पुण्यात राहतोय मुलगा रिक्षा चालवितो. आता मात्र मुलाला अन सुनेला ही आई 'नकोशी' झालीय.. असं सांगत पार्वतीबाईंनी लोकमत प्रतिनिधी समोर अश्रूंचा बांध फोडला.